... साहेब आम्हीच दुकान फोडले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

सागर मांजरे हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर तोफखाना (नगर), एमआयडीसी (नगर) व श्रीरामपूर पोलिस ठाण्यात 10 गुन्हे दाखल आहेत.

राहुरी : विविध ठिकाणी धरपकड करून राहुरी पोलिसांनी काल (सोमवारी) पहाटे चार दरोडेखोरांना अटक केली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यापारी पेठेतील वर्धमान मेन्स वेअर हे कापड दुकान गुरुवारी (ता. 21) मध्यरात्री फोडल्याची कबुली त्यापैकी तिघांनी दिली. चोरीतील 34 हजार रुपयांपैकी 20 हजारांचा मुद्देमाल चोरांनी पोलिसांच्या हवाली केला. 

सागर गोरख मांजरे (वय 22, रा. नगर), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा. भिंगार, नगर), काशिनाथ मारुती पवार (वय 37, रा. बजरंगवाडी, संगमनेर) यांनी राहुरीतील कापड दुकान फोडल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली. या तिघांसह गणेश मारुती गायकवाड (वय 24, रा. उक्कलगाव, श्रीरामपूर) यास पोलिसांनी अटक केली आहे. राहुरी न्यायालयाने चारही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. 

सागर मांजरे टोळीचा सूत्रधार 
सागर मांजरे हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर तोफखाना (नगर), एमआयडीसी (नगर) व श्रीरामपूर पोलिस ठाण्यात 10 गुन्हे दाखल आहेत. त्याने श्रीरामपूरमध्ये दुचाकी (एमएच 17, बीसी 7227) चोरल्याची कबुली दिली. चोरलेली दुचाकी त्याने राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिली. आरोपींकडून वर्धमान कापड दुकानात चोरलेल्या जीन्स, शर्ट, टी-शर्ट, जॅकेट असा 20 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. वर्धमान दुकान फोडण्याची मागील पाच वर्षांत ही सहावी वेळ होती. यापूर्वी पाच वेळा झालेल्या चोऱ्यांतील गुन्हेगार पकडले गेले नव्हते. त्यामुळे दुकानमालक राजेंद्र चुत्तर वैतागले होते. 

कारागृहात झाली टोळी 
सागर मांजरे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर तोफखाना, श्रीरामपूर, एमआयडीसी पोलिस ठाण्यांसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो कारागृहात असताना त्याची अन्य तरुणांबरोबर ओळख झाली. त्याने त्या तरुणांना बरोबर घेत टोळी तयार केली, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. 

स्थानिक गुन्हे केले होते गजाआड 
सागर मांजरे याचा घरफोडीमध्ये हातखंडा होता. नगर परिसरात तो घरफोडी असताना त्याचावर कोणाचाही संशय नव्हता. परंतु, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो रेकॉडवर आला. त्यानंतर त्याने श्रीरामपूर येथे एका सराफ व्यापाऱ्याचे दुकान फोडले. त्यावेळीही त्याला पोलिसांनी गजाआड केले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा राहुरी येथील दुकान फोडले, असे पोलिस तपासात समोर आले. 

आरोपींनी पोलिस कोठडीच्या पहिल्याच दिवशी दोन ठिकाणी केलेल्या चोऱ्यांची माहिती दिली. ही अट्टल गुन्हेगारांची टोळी आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे येत्या काही दिवसांत उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 
- सचिन बागूल, सहायक पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... sir we broke the shop