देशाला नीतिवंत नेत्याची आवश्‍यकता - सीताराम येचुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

विटा - देशातील अन्नदाता शेतकरी आत्महत्या करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना विचार करायला वेळच देत नाही. विविध योजना काढून जनतेला गुंतवून ठेवत आहे. देशाला नेता नाही तर लोकहिताची नीती जपणारा नेता पाहिजे, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले. 

विटा - देशातील अन्नदाता शेतकरी आत्महत्या करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना विचार करायला वेळच देत नाही. विविध योजना काढून जनतेला गुंतवून ठेवत आहे. देशाला नेता नाही तर लोकहिताची नीती जपणारा नेता पाहिजे, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले. 

क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठात २०१८ चा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार त्यांना क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, अशोक ढवळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मराठा आरक्षण राज्याचा प्रश्‍न
पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात श्री. येचुरी म्हणाले, की मराठा आरक्षण देशाचा प्रश्‍न नाही, राज्याचा आहे. तो राज्यांच्या नेत्यांनी सोडवावा. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ज्या-त्या राज्यात मोदी सरकारविरुद्ध सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्यपातळीवर युती करून मोदी सरकार हटावो मोहीम हाती घ्यावी.  
 

श्री. येचुरी म्हणाले, ‘‘सर्वांना समानता मिळाली पाहिजे. सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. नोकऱ्या नाहीत तर आरक्षण देऊन काय उपयोग? सर्वांनी शिक्षण घेतले तर कोणीच अडवू शकणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘सरकार रोज नवीन घोषणा करीत आहे. परंतु, देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जे अकरा लाख कोटी रुपये कर्ज घेऊन देश सोडून पळून गेले, त्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले. त्याचेच कर्ज सरकार भरत बसलेय. त्यामुळे देशाचा विकासदर घटलाय.’’

ते म्हणाले, ‘‘देशाला धर्म, जात, भाषेच्या भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांची नाही, तर देशाला नीतिवंत नेत्यांची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही क्रांतिसिंह नाना पाटील यांनी लोकलढा उभारला. त्यांच्या विचाराची आजही गरज आहे.’’

ज्येष्ठ विचारवंत डॉ. साळुंखे, अशोक ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबूराव गुरव, ॲड. सुभाष पाटील, सुभाष पवार, इंद्रजित पाटील, ॲड. स्वाती पाटील, प्रा. पांडुरंग शितोळे, एस. एस. मुळीक, विश्‍वनाथ गायकवाड यांच्यासह नागरिक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

Web Title: Sitaram Yechuri comment