गडहिंग्लजला दोन अपघातांत ६ ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे. 

गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे. 

गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आज एसटी बस आणि सुमोच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी आहेत. सर्व मृत व जखमी नूल (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. मृतात बाप-लेकाचा समावेश आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात घडला. त्याची भीषणता इतकी होती की, सुमोचा चक्काचूर झाला. अपघाताचे दृश्‍य अंगावर शहारे आणणारे होते. 

अपघातात अाप्पा रावजी सुपले (वय ६८), चंद्रकांत मारुती गरुड (६५), नामदेव सदाशिव चव्हाण (५०) व मनोज नामदेव चव्हाण (२४) यांचा मृत्यू झाला. दिलीप पांडुरंग सुपले (२२), राहुल अण्णाप्पा सावंत (२८), राजाराम गणपती जाधव (४५) गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक तुकाराम जिवबा गोईलकर (वय ५६, रा. उचगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यासाठी नूलमधील कार्यकर्ते चारचाकी गाड्या करून गेले होते. दुपारी मेळावा आटोपून नामदेव चव्हाण यांच्या सुमोमधून (एमएच १२, बीव्ही ९३५३) कार्यकर्ते नूलकडे येत होते. कोल्हापूर आगाराची कोल्हापूर-दोडामार्ग ही बस (एमएच १४, बीटी ४०२९) गडहिंग्लजहून चंदगडकडे जात होती.

दरम्यान, महागाव येथील हॉटेल अनिकेतजवळील वळणावर बसची सुमोला समोरून धडक बसली. रस्त्याकडील झाड आणि बसमध्ये सुमो अडकली. त्यात सुमोचा चक्काचूर झाला. चालक नामदेव चव्हाण यांच्यासह समोर व मधल्या सीटवर बसलेले आप्पा सुपले, चंद्रकांत गरूड व मनोज चव्हाण जागीच ठार झाले. त्यांच्या छाती आणि डोकीला मार बसला आहे. मागील सीटवर बसलेले दिलीप सुपले, राहुल सावंत व राजाराम जाधव गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाला. त्यामुळे शेतात काम करणाऱ्यांसह आजूबाजूचे लोक अपघातस्थळी धावून आले. त्यांनी सुमोमधील मागील सीटवर असणाऱ्या जखमींना आधी बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविले; मात्र सुमो, बस आणि झाडामध्ये अडकल्याने मृतदेह बाहेर काढता येत नव्हते. अखेर जेसीबीच्या साहाय्याने वाहने हलविल्यानंतर सुमोत अडकलेले मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

म्हणून पटली तातडीने ओळख
मेळाव्यासाठी गावातून चार गाड्या गेल्या होत्या. अपघातग्रस्त सुमो सर्वांत पुढे होती. त्यापाठोपाठ इतर गाड्या होत्या. महागावजवळ सुमोला अपघात झाल्यानंतर काही वेळाने पाठीमागील गाड्या घटनास्थळी आल्या. त्यामुळे अपघातातील मृत व जखमींची ओळख तातडीने पटली.

वाहतूक ठप्प...
अपघातस्थळी बघ्यांची गर्दी होती. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे दीड-दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या. तास-दीड तासानंतर रस्ता वाहतुकीस खुला झाला. दरम्यान, अनेकांचा अपघाताचे फोटो आणि शूटिंग करण्यासाठी खटाटोप सुरू होता.

मुख्यमंत्र्यांकडून जखमींची चौकशी
महागाव अपघातात जखमी झालेल्या लोकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काळजीपूर्वक चौकशी केली. जमखींना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना याबाबत तत्काळ सूचना करून, योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री फडणवीस आणि श्री. पाटील यांनी राहुल चिकोडे यांना जखमींची विचारपूस करून तातडीने चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले. श्री. चिकोडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. 

हरळीजवळ आई-मुलाचा अंत

महागाव : सासूच्या अंत्यसंस्काराला जाताना आज मोटार झाडाला धडकल्याने सुनेसह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. वासंती मारुती नांदवडेकर (वय ३५) व सोहम मारुती नांदवडेकर (१०, दोघेही रा. नेसरी तर्फ सावतवाडी, ता. गडहिंग्लज) अशी मृत माय-लेकराची नावे आहेत. 

या अपघातात सहा जण जखमी झाले. मारुती जोतिबा नांदवडेकर (रा. नेसरी तर्फ सावतवाडी), मोतीराम जानबा सावंत, अलका मोतीराम सावंत, दिशा मोतीराम सावंत (तिघेही रा. वाघराळी, ता. गडहिंग्लज), सुप्रिया सुनील भोसले व ओंकार सुनील भोसले (रा. येणेचवंडी, ता. गडहिंग्लज) अशी जखमींची 
नावे आहेत.

नेसरी तर्फ सावतवाडी येथील लक्ष्मीबाई नांदवडेकर (८०) यांचे काल (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा मुलगा मारुती, मुलगी अलका कुटुंबासह पुणे येथे राहतात. आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर मारुती पत्नी व मुलग्यासह, तर अलका पती व कुटुंबासह पुण्याहून रात्री निघाले. दरम्यान, हरळी खुर्द येथे त्यांच्या मोटारीची (एमएच १४, एफएक्‍स ३४५८) रस्त्याकडेला असणाऱ्या निलगिरीच्या झाडाला धडक बसली.

रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन गाडी धडकली. यात वासंती यांचा जागीच मृत्यू झाला. यातील सोहम, मारुती, मोतीराम व ओंकार गंभीर जखमी झाले. अलका, दिशा, सुप्रिया जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यातील सोहमचा उपचार सुरू असताना दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. बेबीताई व सुप्रिया यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, शशिकांत तुकाराम नांदवडेकर यांनी माहिती दिली. निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मारुती यांच्यावर गुन्हा दाखल 
झाला आहे.

Web Title: Six dead in two accident in Gadhinglaj