पालच्या यात्रेसाठी सहा लाखांवर भाविक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

उंब्रज - ‘येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट’च्या गजरात राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत पाल (जि. सातारा) येथील श्री खंडोबा देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली. श्री खंडोबा आणि म्हाळसाकांत यांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. देवस्थान ट्रस्ट, प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या नेटक्‍या नियोजनाने यात्रा शिस्तबद्ध झाली.

उंब्रज - ‘येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट’च्या गजरात राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत पाल (जि. सातारा) येथील श्री खंडोबा देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली. श्री खंडोबा आणि म्हाळसाकांत यांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. देवस्थान ट्रस्ट, प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या नेटक्‍या नियोजनाने यात्रा शिस्तबद्ध झाली.

पाल येथे गेल्या चार दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढली होती. राज्याच्या विविध भागांसह आंध्र प्रदेश, कर्नाटकातून भाविक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होत होते. परंपरेनुसार दुपारी एकच्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून मिरवणुकीस सुरवात झाली. या सोहळ्यासाठी मानकरी, वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. देवस्थानचे मुख्य मानकरी देवराज पाटील मंदिरामध्ये दाखल झाले. तेथे विधिवत पूजन झाल्यानंतर पाटील श्री खंडेरायाचे मुखवटे घेऊन बाहेर आले. त्यांना शिवणी गावच्या मानाच्या बैलगाडीतून नगरपेठेत आणण्यात आले. तेथून ते रथामध्ये विराजमान झाले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून मिरवणूक बाहेर येताच जमलेल्या लाखो भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार,’ ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात भंडारा व खोबऱ्याची उधळण केली. सारी पालनगरी दुमदुमून गेली. मिरवणूक वाळवंटात आल्यावरही भाविकांनी भंडाऱ्याची जोरदार उधळण केली.

सायंकाळी श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडला. 
आमदार बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, प्रभारी गटविकास अधिकारी मधुकर जगताप, मानसिंगराव जगदाळे, सोमनाथ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यात्रेचे देवस्थान ट्रस्ट, प्रशासन आणि पोलिसांनी नेटके नियोजन केले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर परिसरापासून काही अंतरावर बॅरिगेटस लावण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामक दलाची पथके, आरोग्य विभागाची पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार न होता यात्रा उत्साहात पार पडली. दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टने दर्शन बारीची सोय केली आहे.

भाविकांसाठी उंब्रज, सातारा, कऱ्हाड, पाटण येथून एसटी बसची सोय करण्यात आली होती. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

हत्तीऐवजी रथातून मिरवणूक 
खंडोबा देवाच्या यात्रेमध्ये दर वर्षी हत्तीवरून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्यासह देवाची मिरवणूक काढण्यात येते. मात्र, वन विभागाच्या जाचक अटीमुळे यंदाच्या मिरवणुकीत हत्तीचा वापर करण्यात आला नाही. त्याऐवजी यंदा आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. 

Web Title: six lakh bhavik for pal yatra