डल्ला मारणारे सहा पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

'एसपीं'ची कारवाई : निरीक्षक घनवटही लवकरच होणार निलंबित

'एसपीं'ची कारवाई : निरीक्षक घनवटही लवकरच होणार निलंबित
सांगली - वारणानगर येथे शिक्षक कॉलनीत घरफोडी करून नऊ कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या "एलसीबी'तील सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील या सहा जणांना आज निलंबित केले. कोडोली पोलिसांच्या अहवालानंतर पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली. निरीक्षक विश्‍वनाथ घनवट याला निलंबित करण्याचे अधिकार आयजी विश्‍वास नांगरे-पाटील यांना आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल श्री. नांगरे-पाटील यांना पाठवला जाणार आहे.

दरम्यान, एकाचवेळी पोलिस अधिकाऱ्यासह सहा जण निलंबित होण्याची जिल्हा पोलिस दलातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मिरज डीवायएसपी कार्यालयातील कामचुकार आणि कलेक्‍शनफेम चार कर्मचाऱ्यांना अधीक्षक शिंदे यांनी चार महिन्यांपूर्वी निलंबित केले होते. चोरीचा तपास करताना घरफोडी करून 9 कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा संपूर्ण राज्यात डागाळली गेली आहे.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत बिल्डिंग नंबर पाचमध्ये मोठी रोकड असल्याची माहिती संचालकाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या मोहिद्दीन मुल्ला याला होती. त्याने तेथून तीन कोटींहून अधिक रकमेवर डल्ला मारला. मिरजेतील दोन पोलिसांना त्याने बुलेटसाठी पैसे दिले. तोदेखील बुलेटवरून फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार तत्कालीन एलसीबीचे निरीक्षक घनवट आणि पथकाने 12 मार्च 2016 रोजी तीन कोटींहून अधिक रोकड जप्त केली.

रकमेचा तपास करताना सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांनी मुल्लाला घेऊन 13 मार्च रोजी वारणानगर येथे घरफोडी करून सहा कोटी रुपयांवर डल्ला मारला. दोन दिवसांनंतर 15 रोजी निरीक्षक घनवट, चंदनशिवेसह तीन कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारल्याची फिर्याद बांधकाम व्यवसायिक झुंझार सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून घनवट, चंदनशिवेसह पाच पोलिस पसार झाले आहेत.

गुन्हा दाखल झाल्याबाबत कोडोली पोलिस ठाण्याचा अहवाल आज पोलिस अधीक्षक शिंदे यांना प्राप्त झाला. त्यानुसार त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारात सहायक निरीक्षक चंदनशिवे आणि सहायक फौजदार कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांना निलंबित केले. निरीक्षक घनवट याच्यावर दाखल गुन्ह्याचा अहवालही अधीक्षक शिंदे यांना प्राप्त झाला आहे. घनवट यांच्यावर कारवाई होण्याबाबतचा अहवाल आता अधीक्षक शिंदे हे "आयजी' नांगरे-पाटील यांना पाठवतील. त्यामुळे घनवट याच्यावर आज किंवा उद्या निलंबनाची कारवाई होईल.

कारवाईची धाकधूक...
नऊ कोटी 18 लाखांची घरफोडी करणाऱ्या सात पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याची दोन दिवसांपासून पोलिस दलात चर्चा रंगली आहे. घरफोडीनंतर पैशात आणखी काही पोलिस वाटेकरी असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे "सीआयडी'कडे तपास गेल्यानंतर खोलवर तपास होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असलेल्या पोलिसांमध्ये धाकधूक आहे.

प्रॉपर्टीची चर्चा..
गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी फ्लॅट, बॅंका आणि इतरत्र गुंतवणूक केल्याची चर्चा पोलिस दलात चांगलीच रंगली आहे. एकाच्या बॅंकेतील रोकड आणि मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे इतरांनी रोकड कोठे गुंतवली? याबाबत होणाऱ्या जप्तीच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

पोलिसांवर पहिलीच मोठी कारवाई
तत्कालीन एलसीबीच्या सात पोलिसांवर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. एकाचवेळी एवढ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची जिल्हा पोलिस दलातील पहिलीच घटना आहे. त्यानंतर एकाचवेळी सहा पोलिस निलंबित होण्याचीदेखील पहिलीच घटना आहे. खाकीची लक्तरे वेशीवर नव्हे, तर वेशीपलीकडे टांगली गेल्याचे चित्र दिसून येते.

Web Title: six police suspend in sangli