सहा गावांना मार्चमध्ये मिळणार "म्हैसाळ'चे पाणी 

विष्णू मोहिते | Thursday, 7 January 2021

कृष्णा काठावरल्या मिरज तालुक्‍यातील कवलापूर, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी आणि तासगाव तालुक्‍यातील धुळगाव, कुमठेतील वंचित शेतीचे भाग्य येत्या मार्चमध्ये उजळणार आहे.

सांगली : म्हैसाळ योजनेद्वारे कृष्णा नदीचे पाणी जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्‍यापर्यंत पोहोचले. मात्र कृष्णा काठावरल्या मिरज तालुक्‍यातील कवलापूर, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी आणि तासगाव तालुक्‍यातील धुळगाव, कुमठेतील वंचित शेतीचे भाग्य येत्या मार्चमध्ये उजळणार आहे. या भागाला बंदिस्त पाईपद्वारे पाणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चार महिन्यात दोन हजार हेक्‍टर क्षेत्र पाणीदार होईल. 

दुष्काळी भागाचा कायापालट करणाऱ्या म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्‍यातील शेती आता पाणीदार झाली. गेल्या पावसाळ्यात महापूरापासून संरक्षण म्हणूनही तलाव भरुन घेण्यात आले. एकीकडे हा भाग ओलिताखाली येत असताना योजनेतील कळंबी कालव्यात समाविष्ट कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी, कवलापूरसह तासगाव तालुक्‍यातील कुमठे व धुळगाव हद्दीतील काही भाग आजवर पाण्यापासून वंचित राहिला. 

योजनेचे शेपूट आणि शेतकऱ्यांच्याही मागणी अभावी येथे गेल्या दहा वर्षात केवळ तीन - चार वेळा पाणी कालव्यातून सोडले. सोडलेले पाणीही पावसाळ्यात आल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 15 वर्षापूर्वी जमिनींचे संपादन झाले. कालवा झाला मात्र, पाणी दुरापास्तच अशी स्थिती होती. जलसंपदा विभागाने कळंबी कालव्याचे 1 ते 27 किलोमीटर आणि 34 किलोमीटरपर्यंतचे अस्तरीकरण पूर्ण केले आहे. 34 ते 42 किलोमीटर असे साडेसहा किलोमीटर अंतरात बंदीस्त पाईपलाईनव्दारे पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. 

Advertising
Advertising

आता भाडेपट्टा करार... 
सांबरवाडी, काकडवाडी हद्दीत पंधरा वर्षापूर्वी कालवा खोदला आहे. भुसंपादनाची प्रक्रिया अपूर्णच राहिली. तेव्हा प्रति गुंठा दोन हजार रुपये भरपाई देण्यात आली. सध्या बाजारभावाच्या पाचपट भरपाई दिली जाते. आता शेतकरीच भुसंपादनाची मागणी करीत आहेत. त्याऐवजी बंदिस्त पाईपलाईनमुळे भाडेपट्टा करार केले जाणार आहेत. त्यामुळे आधीचा भुसंपादनाचा प्रस्ताव रद्द करावा लागेल. 

यापुढे बंदिस्त पाईपलाईनच... 
या पुढील काळात बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचेच राज्य सरकारचे धोरण आहे. त्यातील हा एक छोटा प्रकल्प. सरकारने तो तातडीने मंजुरी केला. यापुढे शक्‍य तेवढ्या सिंचन योजनांसाठी बंदिस्त पाईपलाईनचा वापर केला जाणार आहे. त्याची कळंबी कालव्यापासून सुरुवात झाली, असे मानायला हरकत नाही. 

पाणी बचत, कमी देखभाल खर्च, कमीत कमी भुसंपादन यामुळे यापुढे आता बंदिस्त पाईपलाईनद्वारेच पाणी पुरवठ्याचे शासनाचे धोरण राहणार आहे. कळंबी कालव्याचे काम मार्चपर्यंत नक्की पूर्ण होईल. एप्रिलपासून पाणी देऊ शकतो. 
- सुर्यकांत नलावडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ योजना.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार