सोळा अध्यक्षांनी केले ५४ वर्षे ‘राज’!

zp-satara
zp-satara

सातारा - मंत्री, खासदार, आमदार घडविणारी कार्यशाळा असलेल्या मिनी मंत्रालयात सध्या राजकीय धुमशान सुरू आहे. याच जिल्हा परिषदेने आतापर्यंतच्या ५४ वर्षांत १६ अध्यक्षांना लाल दिवा देत राजकारणात मान दिला. त्यातील लक्ष्मणराव पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड ठेवून आहेत. त्यातील काही जण अद्यापही राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, आरक्षणाने अध्यक्षपद मिळालेले ‘आउट ऑफ कव्हरेज’ झालेले दिसतात.

पंचायत राज स्थापनेपासून खासदार, आमदार यांच्याशिवाय राजकारणातील दुसरी फळी सक्रिय होण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या राजकारणातून पुढे जात अनेकांनी राज्याच्या राजकारणातही ठसा उमठविला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे असल्याने या पदाला विशेष महत्त्व आहे. मात्र, अध्यक्षपदासाठी आरक्षण लागू झाल्याने राजकारणात ठसा नसतानाही अनेकांना अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे त्यातील अनेकांना राजकीय कारभारात आपल्या कार्याचा ठसाही उमठविता आला नाही. 

जिल्हा परिषदेचे सलग दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले माजी खासदार लक्ष्मणराव पाटील हे प्रदीर्घ काळ जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निष्ठावंत असून, अद्यापही जिल्ह्याच्या राजकारणावर ते वरचष्मा ठेऊन आहेत. त्यांच्यानंतर शिवाजीराव महाडिक हे सध्या काही प्रमाणात कोरेगावच्या राजकारणापुरते, तर अरुणादेवी पिसाळ या कुटुंबाच्या माध्यमातून वाईच्या राजकारणात सक्रिय दिसतात. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, माणिकराव सोनवलकर, सुभाष नरळे यांना आरक्षणातून पद मिळाले असले, तरी ते सध्या गट- गणांच्या राजकारणात कार्यरत दिसतात. 

जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये प्रथम यशवंत पाटील- पार्लेकर अध्यक्ष झाले. तेव्हापासून सुभाषराव देशमुख यांच्यापर्यंत आरक्षण लागू नव्हते. शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात १९९६ मध्ये प्रथम आरक्षण जाहीर करण्यात आले. त्या वेळी एक वर्षासाठी आरक्षण होते. पुढे काँग्रेस आघाडी सरकारने हे आरक्षण अडीच वर्षांसाठी केले. शिवाजीराव महाडिक हे आरक्षणातून झालेले पहिले अध्यक्ष होय.

२० वर्षांनंतर आरक्षण 
खुल्या प्रवर्गासाठी झाल्याने अनेकांनी जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत उडी मारली आहे. 

...यांनी घेतली भरारी
अध्यक्षपदानंतर सूर्याजी ऊर्फ चिमणराव कदम हे आमदार, उपाध्यक्षपदानंतर शंकरराव जगताप हे विधान परिषदेचे सभापती, शिक्षण सभापतिपदानंतर जी. जी. कदम हे आमदार, तर लक्ष्मणराव पाटील हे खासदार झाले. 

असे झाले अध्यक्ष....
यशवंत पाटील-पार्लेकर, भागवतराव देसाई, बाबूराव घोरपडे, चिमणराव कदम, लक्ष्मणराव पाटील, सुभाषराव देशमुख, शिवाजीराव महाडिक, जयसिंगराव फरांदे, नारायणराव पवार, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हेमलता ननावरे, भाग्यश्री भाग्यवंत, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ, माणिकराव सोनवलकर, सुभाष नरळे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com