सहावा रविवारही एटीएमच्या रांगेतच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

कोल्हापूर : एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय होऊन आज 40 दिवस पूर्ण झाले; पण आजही नोटांची चणचण कायम आहे. आजचा सहावा रविवारही लोकांना सुरू असलेल्या काही एटीएमच्या रांगेतच काढावा लागला. शहरातील 80 टक्के एटीएम बंदच असून उपनगरात तर गेल्या काही दिवसापासून अपवाद वगळता एखाद-दुसरे एटीएम सुरू राहिले आहे.

कोल्हापूर : एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय होऊन आज 40 दिवस पूर्ण झाले; पण आजही नोटांची चणचण कायम आहे. आजचा सहावा रविवारही लोकांना सुरू असलेल्या काही एटीएमच्या रांगेतच काढावा लागला. शहरातील 80 टक्के एटीएम बंदच असून उपनगरात तर गेल्या काही दिवसापासून अपवाद वगळता एखाद-दुसरे एटीएम सुरू राहिले आहे.

8 नोव्हेंबरला रात्री अचानकपणे बाजारातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दिवसापासून आजअखेर लोकांच्या हातात चलनच येत नाही. रोजचे व्यवहार कसे करायचे असा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होऊ लागला आहे. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या काही दिवसांत बाजारात आणलेल्या नव्या नोटा बाजारात न येता त्या पुन्हा ठेवणीतच गेल्या. त्यामुळे बाजारातील मागणीप्रमाणे चलन पुरवठा होत नाही. गरज असणारे आणि गरज नसणारेही रोज काही ना काही कारणाने पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काढलेला पैसा बाजारात आणि बाजारातून पुन्हा बॅंकेत असा व्यवहार होत नसल्याने काढलेले पैसे नेमके मुरतात कुठे याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात गल्लीबोळात शेकडो एटीएम आहेत. पण गेल्या काही दिवसांत त्यापैकी काही एटीएमच सुरू आहेत. ज्या एटीएममध्ये पैसे आहेत, तेथे फक्त दोन हजार रुपयांच्या नोटांचा भरणा केल्याचे दिसते. दोन हजार रुपयांची नोट व्यवहारात अडचणीची ठरत असून सुट्टे पैसे मिळणे कठीण झाले आहे. परिणामी संपूर्ण बाजारात मंदीची लाट आली आहे. नोटाबंदीचा परिणाम झालेले नाही, असे एकही क्षेत्र राहिलेले नाही. कुठेही गेले तरी नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरच चर्चा सुरू होते.

जिल्हा बॅंकेवर घातलेले निर्बंध काही प्रमाणात मागे घेतल्याचे सांगितले जात असले तरी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी नवीन वर्ष उगवायला हवे, अशी स्थिती आहे. जिल्हा बॅंकेवर निर्बंध आणल्याने ग्रामीण भागातील व्यवहार अक्षरशः ठप्प आहेत. दूध आणि उसाच्या बिलाचे कोट्यवधी रुपये बॅंकेत जमा झाले आहेत. पण दोन हजार रुपयांच्या वर रक्कम हातात पडत नाही. आठवडी बाजारात फारशी गर्दी होत नाही.

एटीएमबाहेर मध्यरात्रीपर्यंत गर्दी
शहरातील बाजारपेठेतही शुकशुकाटच दिसते. एटीएमची संख्या पुरेशी असली तरी त्यापैकी बहुतेक बंद आहेत. एरवी अगदी अत्यावश्‍यक कारणासाठीच रात्री एटीएममधून पैसे काढले जात होते. पण आता मध्यरात्र उलटून गेली तरी पैसे उपलब्ध असलेल्या एटीएमवर लोकांच्या रांगा दिसता आहेत. अनेक जण सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतात. पण पैशाच्या तुटवड्यामुळे सारेच बेत रद्द करण्याची वेळ आली आहे. नोटाबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य यासंबंधी मतमतांतरे असली तरी लोकांचा त्रास मात्र अजूनही संपलेला नाही. त्यांच्या नशिबातील रांगेत उभारणे संपत नाही हेच खरे.

Web Title: sixth consecutive sunday in atm queue