शालेय शिक्षणातही शासनाचे 'स्कील इंडिया'

युवराज पाटील
शनिवार, 17 डिसेंबर 2016

कौशल्य सेतू-2016 ही शिक्षणमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी शाळांची नोंदणी सुरू असून, दहावी अनुत्तीर्ण नव्हे, तर गेल्या तीन-चार वर्षांत ज्या विद्यार्थ्यांनी आठवी अथवा नववीला शाळा सोडली, त्यांना आवडीनुसार अभ्यासक्रम निवडता येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना दहावी, बारावीच्या समकक्षेत आणले जाईल. एकाचवेळी कौशल्य अभ्यासक्रम आणि दहावी, बारावी समकक्ष अशी संधी मिळेल.
एम. के. गोंधळी, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग.

कोल्हापूर - दहावी नापास विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू योजनेद्वारे हाताला काम देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावीबरोबर आठवी, नववीचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे दिले जाणार आहेत. त्यांनी विशिष्ट काळाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, की दहावी आणि बारावी उत्तीर्ण असल्याचे समजून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा हा "ड्रीम प्रोजेक्‍ट' आहे. जी मुले दहावी मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होऊन जुलैच्या फेरपरीक्षेला बसतात. त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी दिली जाणार आहे. ऐंशी टक्के प्रात्यक्षिक आणि वीस टक्के आकलन असे अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल युवा को-ऑपेटिव्ह सोसायटीशी अर्थात एनवायसीसी या संस्थेशी संपर्क करावा लागेल. त्याचे शुल्क अकरावीइतके अथवा शासन जे निश्‍चित करेल तितके असेल. प्रवेशासाठी आधारकार्ड, छायाचित्र व निकालपत्राची प्रत आवश्‍यक आहे. अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी आणि इंग्रजी असेल. ऐंशी टक्के प्रात्यक्षिक आणि वीस टक्के लेखी अशी गुणांची विभागणी होईल. कौशल्य अभ्यास पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होण्याइतपत समकक्ष आहे, असे समजले जाईल. दहावी अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा संबंधितास देता येईल.

अभ्यासक्रम नॅशनल स्कील क्वॉलिटी फ्रेमवर्क (एनएसक्‍यूएफ) त्या दोन ते चार या स्तरानुसार असेल. तो पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे (पीएमकेव्हीवाय) प्रमाणपत्र दिले जाईल.

दहावीच्या वर्गशिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण, तीन मिनिटांची ध्वनिचित्रफीत, समुपदेशन कार्यपद्धती, मोबाइल ऍपद्वारे विद्यार्थ्यांची माहिती मिळेल. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार एक ते पाच असा पसंतीक्रम देतील. वर्गशिक्षकांना फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांशी चर्चा करून ऍपच्या मदतीने माहिती घेऊन अहवाल द्यावा लागणार आहे. हा डेटा नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडे दिल्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संपर्क साधतील. नंतर राज्य तांत्रिक शिक्षण बोर्ड जिल्हा आणि तालुका स्तरावरील शासकीय तंत्रनिकेतन प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू करतील.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मशीन ऑपरेटर, शिवणकाम, कर्टिंग मास्टरी, गारमेंट फॅक्‍टरीमध्ये रोजगार मिळणे सोपे होईल. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग होईल.

Web Title: skill india scheme in schools