घोड धरणातील गाळ ठरतोय घातक

sludge status of the  ghod dam are dangerous
sludge status of the ghod dam are dangerous

 श्रीगोंदे : मोठ्या प्रमाणात अगोदरच असलेल्या अचल साठ्याने घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे धरणाची मूळ पाणी साठवणक्षमता कमी झाली आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना अचल साठ्यातील पाणी वापरता येत नाही. त्यातच आता धरणातील नव्याने वाढलेला गाळ अडचणीचा ठरणार आहे. गाळामुळे धरणातील पाण्याची साठवणक्षमता घटत चालली आहे. नव्याने आलेल्या गाळ सर्वेक्षण अहवालात धरणातील उपयुक्त पाणीसाठा अजून अर्धा टीएमसीने घटला आहे. 

पुणे व नगर जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांतील शेती ओलिताखाली आणणाऱ्या घोड धरणातील पाणीसाठा वाढत्या गाळामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. या उलट लाभक्षेत्रातील सिंचन वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीतही भर पडत आहे. या धरणाची मूळ क्षमता 7.6 टीएमसी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यातील अचलसाठा वाढून उपयुक्त पाणी साठवणक्षमता 5.4 टीएमसी राहिली होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरवातीला पाण्याची कमतरता भासते. 

धरणातील गाळ वाढला 
दरम्यान, आता नव्याने जलसंपदा विभागाने केलेल्या घोड धरणातील गाळ सर्वेक्षणात "घोड'मधील गाळ अजून वाढल्याचे पुढे आले आहे. मध्यंतरी दोन्ही जिल्ह्यांतील तहसीलदारांनी धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांना शेतात टाकण्याची परवानगी दिली होती. त्या वेळी काही गाळ कमी झाला. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ झाल्याचे लक्षात येत आहे. 

अर्ध्या टीएमसीने पाणीसाठा घटला 
जलसंपदाच्या आकडेवारीनुसार आता धरणाची मूळ पाणी क्षमता 7.6 टीएमसीवरून 5.9 टीएमसीवर आली आहे. गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा क्षमता 5.4 टीएमसी होती. ती आज 4.873 वर आली आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील उपयुक्त पाणीसाठा पुन्हा अर्ध्या टीएमसीने घटला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यंदा धरण सध्याही ओव्हर-फ्लो होत असले, तरी रब्बीत एक व उन्हाळ्यात दोन अशी तीनच आवर्तने मिळतील, अशी शक्‍यता आहे. 

बेकायदेशीर उपसा थांबवणे हाच पर्याय... 
धरणातील गाळ वाढत असतानाच धरणातून होणारा बेकायदेशीर पाणीउपसा अडचणीत भर टाकतो. शिवाय कालव्यांवर पाइपातून उपसा केल्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. धरणातील पाण्याची चोरीही बिनबोभाट होते. अर्थात याला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळते. 

पाणी क्षमता घटली 
नव्या गाळ सर्वेक्षण अहवालात "घोड'मधील पाणी क्षमता घटली आहे. गाळ काढणे हा त्यासाठी उत्तम उपाय असला, तरी त्यातही अडचणी येतात. पाण्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांची मदत आवश्‍यक आहे. 
- स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com