भाजप सरकारमुळे छोटे उद्योग संकटात - डॉ. भालचंद्र कानगो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

देवठाण - 'काळ्या पैशांच्या नावाखाली भाजप सरकारने जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली. नोटाबंदीच्या नावाखाली श्रीमंत, उद्योजकांचे पैसे "व्हाइट' केले. निवडणुकीत आर्थिक मदत करणाऱ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला. त्यानंतर "जीएसटी' लागू करून छोटे व्यावसायिक संपविण्याचे काम केले. अदानी-अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांना शरण गेलेले हे सरकार आहे,'' अशा शब्दांत भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कानगो यांनी सोमवारी टीका केली.

महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे बारावे अधिवेशन अकोल्यात आज सुरू झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारभारी उगले होते. माजी मंत्री मधुकर पिचड, सुभाष लांडे, श्‍याम काळे आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. कानगो म्हणाले, 'विडी कामगारांच्या प्रश्नांत अकोले-संगमनेरचे योगदान कायम राहिले. भविष्यात विडी कामगारांचे प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्‍यता आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित होताना जुने धंदे मरतात; मात्र या मरणाऱ्या धंद्यांना सरकारने मदत केली पाहिजे. भाजप सरकारमुळे छोटे उद्योग संकटात आले. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत "भाजप हटाव'साठी काम सुरू करावे.''

विडी कामगारांच्या मुला-मुलींचे मोफत शिक्षण झाले पाहिजे, दरमहा साडेतीन हजार रुपये निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे, विडी कामगारांना पिवळे रेशनकार्ड मिळावे, घरकुल योजनेतून घर मिळावे, या मागण्या अधिवेशनात करण्यात आल्या.

जातीय दंगली घडविण्याचा डाव - पिचड
मधुकर पिचड म्हणाले, 'साखर व्यवसाय अडचणीत असताना शत्रुराष्ट्र पाकिस्तानातून हे सरकार साखर आणते. देशात गोमांस, जातिधर्मांच्या नावाखाली दंगली घडविल्या जातात. 2019च्या निवडणुकीपूर्वीही जातीय दंगली घडवून सत्ता मिळविण्याचा त्याचा अजेंडा आहे. त्यासाठी सावध राहा. फडणवीस सरकार, आम्हाला समृद्धी महामार्ग नको. गावोगावचे, खेड्यापाड्यांतील रस्ते बनवून द्या.''

Web Title: small business in disaster by BJP Government Bhalchandra Kanago