‘म्हैसाळ’जवळ छोटे धरण

‘म्हैसाळ’जवळ छोटे धरण

सांगली - म्हैसाळ येथे सध्याच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळचा पाणी साठा वाढवण्यासाठी नवीन बराज (धरण) बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. मंत्रालयात महामंडळाचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, प्रधान सचिव श्री. चहल, मुख्य अभियंता तात्यासाहेब मुंडे, मुख्य अभियंता रजपूत यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

महामंडळाच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पास मान्यता देऊन नव्याने अर्थसंकल्प मांडण्यात आला. बैठकीत सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. 

महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘‘सिंचन योजनांचा वीज बिलातील ८१ टक्के वाटा राज्य शासन तर उर्वरित १९ टक्के वाटा शेतकरी भरतील हे सूत्र आता मान्य झाले. आता हा निधी शासनाने महामंडळाला वेळेत उपलब्ध करून द्यावा यासाठी आजच्या बैठकीत रीतसर प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामुळे हा शाश्‍वत निधी उपलब्ध झाल्यास वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडणार नाहीत.’’
बैठकीत न्यायालयाच्या विविध निर्णयांचाही आढावा घेण्यात आला. भूमी संपादनाचे प्रस्तावही बैठकीपुढे होते. वांग, टेंभू प्रकल्पांना केंद्राच्या योजनांमधून निधी मिळण्यासाठीच्या दायित्व निधीस मान्यता देण्यात आली.

तांत्रिक मंजुरी प्रक्रिया पार पडली
बैठकीतील प्रमुख निर्णयांची माहिती देताना खासदार पाटील म्हणाले, ‘‘ऐन आवर्तन काळात म्हैसाळ योजनेच्या पंपाना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी दरवर्षी उद्‌भवतात. त्यामुळे सध्याच्या बंधाऱ्यापासून पुढे साधारण पन्नास मीटरवर हा बंधारा तथा बराज असेल. त्यामुळे पुरेसा पाणी साठा होईल. सुमारे सव्वाशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीची सर्व तांत्रिक मंजुरी प्रक्रिया आज पार पडली. निविदा प्रक्रियाही गतीने राबवली जाईल. निधीची कमतरता पडू देणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com