संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठार

हरिभाऊ दिघे 
सोमवार, 26 मार्च 2018

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात घरानजीक पहाटे शौचास बसलेल्या बालिकेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनी सीताराम कडाळे (वय ४) ही बालिका जागीच ठार झाली. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्याने आई समोरून बालिकेस ओढून नेण्याची ही खळबळजनक घटना घडली.

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात घरानजीक पहाटे शौचास बसलेल्या बालिकेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनी सीताराम कडाळे (वय ४) ही बालिका जागीच ठार झाली. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्याने आई समोरून बालिकेस ओढून नेण्याची ही खळबळजनक घटना घडली.

सीताराम तुकाराम कडाळे हे मालदाड येथील माधव दत्तू नवले यांची शेती वाट्याने करतात. खळ्याचा मळा याठिकाणी कडाळे कुटुंबीय झोपडीवजा घरात राहत असून त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आई समवेत अश्विनी कडाळे ही बालिका घराबाहेर आली व नजीकच शौचास बसली. दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालिकेवर झडप घातली व तिच्या गळ्यास पकडून दूर ओढत नेले. पत्नीने आरडाओरडा केल्याने सीताराम कडाळे यांनी बिबट्यास दगड फेकून मारीत मुलीस वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्या मुलीस सोडून पळाला. मात्र बिबट्याने गळ्यास पकडल्याने अश्विनी हिच्या गळा व मानेवर खोलवर जखमा झाल्या होत्या.

तिला उपचारार्थ तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. सकाळी पदाधिकारी व ग्रामस्थांनी कडाळे कुटुंबीयास धीर दिला. उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर यांनी घटनास्थळी भेट दिली. वनपाल एस. एस. बस्ते व कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या खबरीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या कडाळे कुटुंबीयांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

अन्यथा आंदोलन छेडणार.. 
मालदाड परिसरात चार ते पाच बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. वनविभागाने त्वरित पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विपुल नवले, राहुल नवले, भाऊसाहेब नवले, विलास नवले, उत्तम नवले सहित ग्रामस्थांनी दिला.

Web Title: small girl died in leopards attack in sangamner