Video :  कचराकुंडीच्या जागेत फुलले स्मार्ट उद्यान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

एकेकाळी कचऱ्याचे ढीग साचणाऱ्या या जागेत एक सुंदर उद्यान साकारले आहे. त्यासाठी ओमप्रकाश दरगड आणि त्यांचे चिरंजीव दीपक दरगड यांनी प्रयत्न केले. 

सोलापूर -  छत्रपती संभाजी चौक ते तुळजापूर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधले जात आहे ते नाल्याच्या परिसरात  फुललेल्या श्रीरामनिधी उद्यानाककडे. एकेकाळी कचऱ्याचे ढीग साचणाऱ्या या जागेत एक सुंदर उद्यान साकारले आहे. त्यासाठी ओमप्रकाश दरगड आणि त्यांचे चिरंजीव दीपक दरगड यांनी प्रयत्न केले. 

काही महिन्यांपूर्वी कारंबा नाका पुल ते तुळजापूर रस्त्या या मार्गावर जाताना सुरवातीलाच ही कचरा कुंडी लागायची. या कुंडीच्या समोरच उड्डाणपूल आहे. त्यामुळे राज्यातून-परराज्यातील वाहनांची वर्दळ कायम आहे. या ठिकाणी आले की एसटी किंवा खासगी मोटारीतील प्रवाशी नाकाला रुमाल लावत. सोलापूर शहराची स्मार्ट सिटीत निवड झाल्याने आपलाही त्यात खारीचा वाटा असावा असा निर्णय दरगड पितापुत्रांनी घेतला आणि कचराकुंडी परिसराचा पूर्णपणे कायापालट करीत एक सुंदर आणि आकर्षक उद्यान साकारले. 

या ठिकाणी करण्यात आलेली हिरवळ डोळ्यांना सुखद धक्का देणारी आहे. विविध प्रकारची फुलझाडी लक्ष वेधून घेत आहेत. पक्षांना धान्य खाता येईल अशा पद्धतीच्या बाटल्याही या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय झाला आहे. घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीमुले ज्या ठिकाणाहून लवकर जाण्यासाठी धडपडणारे लोक आता त्या ठिकाणी थांबून सेल्फी घेत आहेत. एखादी योजना राबविण्याचे मनात आणले तर माणूस काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

उद्यान साकारल्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. पूर्वी या ठिकाणाहून जाणाऱ्या लोकांच्या कपाळावर आठ्या दिसायच्या, आता तेच लोक उद्यानासमोर उभारून सेल्फी काढत आहेत.
- ओमप्रकाश दरगड

सोलापूर शहर खर्या अर्थाने स्मार्ट व्हायचे असेल तर विविध कामांमध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याची सुरवात आम्ही स्वतःपासून केली आणि
वडीलांच्या कल्पनेतून या ठिकाणी स्मार्ट उद्यान साकारले.
- दीपक दरगड

दरगड पिता-पुत्रांनी स्वयंस्फुर्तीने उद्यान साकारून सोलापूरकरांसमोर आदर्श ठेवला आहे. शहर विकासामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकास महापालिकेमार्फत आवश्यक ते सहकार्य होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart garden in solapur