पंधरा हजार स्मार्ट फोन, दीड हजारावर टू व्हीलर्सची विक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

गुढी पाडवा खरेदी - बाजारपेठ हाउसफुल्ल; फ्रीज, एसीनेही गाठला खरेदीचा उच्चांक

गुढी पाडवा खरेदी - बाजारपेठ हाउसफुल्ल; फ्रीज, एसीनेही गाठला खरेदीचा उच्चांक
कोल्हापूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या आजच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली. स्मार्ट फोनला सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक मागणी राहिली. मुदतबंद ठेवी, इन्शुरन्सचा मुहूर्तही अनेकांनी साधला. सराफ कट्‌ट्‌यासह ऑटोमोबाइल, रिअल इस्टेट, विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंपासून ते शिलाई मशीन आणि पाण्याच्या शेगडीपर्यंत सर्वच क्षेत्रांत तेजीचे वातावरण राहिले. उन्हाच्या झळा वाढल्या असल्याने एसी आणि फ्रीजनाही मोठी मागणी राहिली.
दरम्यान, सायंकाळी सराफ पेढ्यांतही सोन्या-चांदीसह हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी राहिली. विविध सुवर्ण भिशी योजनांनाही प्रारंभ झाला. मुहूर्तावर गुंजभर का असेना सोने खरेदी करण्याची परंपराही अनेकांनी जपली.

फ्रीज, एसी अन्‌ फॅन...
गुढी पाडव्याच्या तुलनेत अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त बाजारपेठेच्या दृष्टीने कमी उलाढालीचा मानला जात असला तरी वाढत्या उन्हामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्ताएवढीच किंबहुना त्याहूनही काही अंशी अधिक फॅन, फ्रीज व एअरकुलर्सची विक्री झाली; मात्र त्याची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध झाली नाही.

स्मार्ट फोन खरेदीत ग्राहक वाढला
बाजारात साडेचार हजारांपासून स्मार्ट फोन उपलब्ध असून एकट्या शहरात पंधरा हजारांवर स्मार्ट फोनची विक्री झाली. मोबाइलवर सिमकार्ड, टॉकटाइम अशा अनेक ऑफर्स असल्याने उलाढालीचा उच्चांक गाठला. स्मार्ट फोनच्या खरेदीत तब्बल सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहक वाढला असल्याचे चित्र या निमित्ताने अनुभवायला मिळाले.

साडेचारशे चारचाकी
ऑटोमोबाइल्स क्षेत्रातही तेजीचेच वातावरण राहिले. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक कंपन्यांच्या दुचाकींमध्ये सुमारे दीड हजार दुचाकींची व साडेचारशेहून अधिक चारचाकींची विक्री झाली. फायनान्स देणाऱ्या विविध वित्तीय संस्थांमध्येही या निमित्ताने गर्दी अनुभवायला मिळाली.

शहर परिसरात गृह प्रकल्प
वाढत्या शहरीकरणामुळे कोल्हापुरातील रिअल इस्टेट क्षेत्र विस्तारत असून, या क्षेत्रातही किमान वीस कोटींची उलाढाल झाली. कोल्हापूर शहर परिसरातील विविध गावांमध्ये आता रिअल इस्टेट क्षेत्र वाढले असून, अगदी पंधरा ते वीस लाखांपासून येथे रो बंगलोजचे प्रकल्प साकारले जात आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांनी अशा प्रकल्पांची मुहूर्तमेढही आज रोवली. लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवर आज गारमेंट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.

हेल्थ इक्विपमेंट्‌स
बदलत्या जीवनशैलीत व्यायाम आणि तद्‌नुषंगिक गोष्टींकडे तरुणाईसह सर्वच वयोगटातील लोकांचा कल वाढला आहे. सायकलीपासून ते ट्रेडमिलपर्यंत सर्वच हेल्थ इक्विपमेंट्‌सना मोठी मागणी राहिली.

सामाजिक जाणिवांचा जागर
कडुनिंबाची रोपे भेट देऊन आणि विविध विधायक उपक्रमांनीही गुढी पाडवा साजरा झाला. काही ठिकाणी सर्वधर्मसमभावाची तर काही ठिकाणी व्यसनमुक्तीची गुढी उभारली गेली. "पाणी वाचवा', "पर्यावरण वाचवा', "लेक वाचवू या' असा संदेश देतही विविध उपक्रमांवर भर दिला गेला. सोशल मीडियावरूनही अशाच पद्धतीने अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: smart phone & two wheeler sailing at gudipadava