स्मार्ट रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच होणार सुरवात

विजयकुमार सोनवणे
रविवार, 29 एप्रिल 2018

हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील अंडरपासलाही मंजुरी मिळाल्याने त्याचेही काम लवकरच सुरू होईल. त्याच धर्तीवर ज्ञानप्रबोधिनी ते डफरीन चौक ते डाॅ. आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाचाही विभागणी करण्यात आली आहे.

सोलापूर : स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरवात होणार आहे. हे कामही दोन टप्प्यात केले जाणार आहे. त्यामुळे एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवला जाणार आहे. डिसेंबर 2018 अखेर दोन्ही टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सध्या रंगभवन चौक ते मराठा मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील अंडरपासलाही मंजुरी मिळाल्याने त्याचेही काम लवकरच सुरू होईल. त्याच धर्तीवर ज्ञानप्रबोधिनी ते डफरीन चौक ते डाॅ. आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाचाही विभागणी करण्यात आली आहे.
पहिल्या भागात डाॅ. आंबेडकर पुतळा ते नॅार्थकोट ते आयएमए हॅाल ते डफरीन रुग्णालय या बाजूने रस्त्याचे काम करण्यात येईल. त्यामुळे एम्प्लायमेंट चौकाकडून महापालिकेच्या 
दिशेने जाणारा एकेरी मार्ग सुरु राहणार आहे.

त्याचवेळी डफरीन चौकाकडून होम मैदानाकडे जाणारा मार्ग पत्रे लाऊन बंद केला जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना एम्प्लॅायमेंट चौक ते डफरीन चौक ते महापालिका ते डॅा. आंबेडकर चौक ते सरस्वती चौक किंवा रामलाल चौकाकडे जात येणार आहे. त्याचवेळी डाॅ. आंबेडकर पुतळ्यापासून डफरीनकडे जाणारा रस्ता मात्र बंद असणार आहे.

दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु झाल्यावर वाहतुकीचा मार्ग कसा असेल, याबाबत नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त वैशाली शिंदे, पोलिस
निरीक्षक संतोष काणे व तपन डंके यांनी बैठक घेऊन संभाव्य आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सरस्वती चौकाकडून एम्प्लायमेंटकडे जाण्यासाठी डॉ. आंबेडकर चौकातून
महापालिकेच्या मागील बाजूने आयु्क्तांच्या बंगल्यासमोरून चंदेले महाविद्यालामार्गे जावे लागेल.

सात रस्त्याकडे जाण्यासाठी डॉ. आंबेडकर चौक ते डॉ. फडकुले सभागृहासमोरून होम मैदानाकडे जाणारा रस्ता ते डफरीन चौक ते मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ते हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागच्या बाजूने सात रस्त्याकडे जावे लागणार आहे.

आज सूचना निघण्याची शक्यता

स्मार्ट रोडच्या दुसऱ्या कामासाठी डॉ. आंबेडकर चौक ते डफरीन चौक ते ज्ञानप्रबोधिनीपर्यंचा रस्ता बंद करण्याबाबतची सूचना उद्या (सोमवारी) निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम संपले की रस्ता बंद करण्याची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी कार्यालयातून देण्यात आली.

Web Title: Smart Road Second Step Work will be start