सोलापूर महापालिकेच्या वीस शाळा 'स्मार्ट स्कूल' 

विजयकुमार सोनवणे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

आयुक्तांनी सुचनेनुसार  59 पैकी 20 शाळांची यादी तयार केली आहे. अंतिम यादी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निश्‍चित होईल. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ

सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेल्या शहरातील सरकारी शाळा "स्मार्ट स्कूल' म्हणून आकार घेणार आहेत. सोलापूर महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून  वीस शाळा "स्मार्ट स्कूल'करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे. 

लखनऊमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी शाळांचा दर्जा सुधारविण्याबाबत सूचना केल्या होत्या. याशिवाय स्मार्ट सिटीसाठी आवश्‍यक घटकांबाबतही सूचना केली होती. त्याला अनुसरून या शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्याची यादी तयार करण्याच्या सूचना प्रशासनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यादी आल्यानंतर शाळांची अंतिम निवड करण्यात येईल. महापालिकेच्या सध्या 59 शाळा आहेत. त्यापैकी बहुतांश शाळांमध्ये एलईडी स्क्रीन आहे. डिजीटल शिक्षणाची सोय आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांतून अत्याधुनिक यंत्रणेची व्यवस्था या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. खासगी शाळांमध्ये ज्या पद्धतीने डिजीटल शिक्षणाची सोय आहे, त्याच धर्तीवर महापालिकांच्या शाळेतही सुविधा केली जाणार आहे. 

स्मार्ट स्कूल करण्यासाठी सोलापूर शहरातील सर्वाधिक अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असलेल्या शाळांचा दौरा केला जात आहेत. त्यानुसारच्या सुविधा महापालिकेच्या शाळांमध्ये केल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ खासगी शाळेतच अशा सुविधा मिळू शकतील, हा समज दूर होणार असून, गोरगरीबांच्या मुलांनाही अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. 

आयुक्तांनी सुचनेनुसार  59 पैकी 20 शाळांची यादी तयार केली आहे. अंतिम यादी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निश्‍चित होईल. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ

Web Title: smart school in Solapur municipal corporation