‘स्मार्ट ग्राम’साठी रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सातारा - राज्य शासनाने नव्याने सर्व जिल्ह्यांसाठी स्मार्ट ग्राम योजना राबविली आहे. त्यात तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामचा निकाल नुकताच लागला असून, आता ‘जिल्हा स्मार्ट ग्राम’साठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १५ ते २१ एप्रिलपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत गुणांकन देऊन स्मार्ट ग्रामची घोषणा केली जाणार आहे. त्यास ४० लाख रकमेचा पुरस्कार मिळणार आहे.

सातारा - राज्य शासनाने नव्याने सर्व जिल्ह्यांसाठी स्मार्ट ग्राम योजना राबविली आहे. त्यात तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामचा निकाल नुकताच लागला असून, आता ‘जिल्हा स्मार्ट ग्राम’साठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १५ ते २१ एप्रिलपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत गुणांकन देऊन स्मार्ट ग्रामची घोषणा केली जाणार आहे. त्यास ४० लाख रकमेचा पुरस्कार मिळणार आहे.

पर्यावरण संतुलित ग्राम योजनेतील निकष बदलल्याने नंतर राज्य सरकारने २०१६ मध्ये स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही या योजनेत जिल्ह्यातील गावांची तालुकास्तरावर निवड केली आहे. प्रत्येक तालुक्‍यातून एका गावाची निवड झाली असून, पुढे जिल्हास्तरावर याची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून, त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती १५ ते २१ पर्यंत ११ गावांची तपासणी करणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर स्मार्ट ग्रामची घोषणा होईल. तालुकास्तरावर नागठाणे गावास ९४, धामणेरला ९७, मान्याचीवाडीला ९४ गुण मिळाले आहेत. यामुळे या गावांत रस्सीखेच असणार आहे. 

...असे असेल गुणांकन
स्वच्छतेसाठी (वैयक्‍तिक, सार्वजनिक शौचालये, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) २० गुण, व्यवस्थापनासाठी (पायाभूत सुविधा, शिक्षण सुविधा, केंद्र व राज्याच्या योजनांची अंमलबजावणी, प्लॉस्टिक बंदी, बचत गट) २५ गुण, दायित्वासाठी (करवसुली, पाणीपुरवठा, वीज बिलांचा नियमित भरणा, अपंगांवरील खर्च, लेखा परीक्षण पूर्तता, ग्रामसभा आयोजन, लेखा पूर्तता) २० गुण, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणासाठी (एलईडी दिवे, सौर दिव्यांचा वापर, बायोगॅस यंत्रणा, कृषी लागवड, जलसंधारण) २० गुण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञानास (ग्रामपंचायत अभिलेखांचे संगणकीकरण, ई-सुविधा, १०० टक्‍के आधार नोंदणी, ग्रामंपचायतीचे संकेतस्थळ, संगणकीय वापर) १५ गुण असे १०० गुणांकन होईल. 

तालुकास्तरावरील स्मार्ट ग्राम
नागठाणे (ता. सातारा), धामणेर (ता. कोरेगाव), पांगरखेल (ता. खटाव), लोधवडे (ता. माण), खराडेवाडी (ता. फलटण), साळव (ता. खंडाळा), वयगाव (ता. वाई), मेटगुताड (ता. महाबळेश्‍वर), हातगेघर (ता. जावळी), जखीणवाडी (ता. कऱ्हाड), मान्याचीवाडी (ता. पाटण). 

Web Title: Smart Village project