अशी पाण्यातून वाट काढत १०८ रुग्णवाहिका नेली (व्हिडिओ)

शिवाजीराव चौगुले
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सर्पदंश झालेल्या सनीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून १०८ रुग्णवाहिका नेऊन रुग्णसेवा करणाऱ्या जिगरबाज चालक नागेश शिंदे (रा. बिळाशी ता. शिराळा) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिराळा - सर्पदंश झालेल्या सनीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून १०८ रुग्णवाहिका नेऊन रुग्णसेवा करणाऱ्या जिगरबाज चालक नागेश शिंदे (रा. बिळाशी ता. शिराळा) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नाटोली (ता. शिराळा) येथील सनी रामचंद्र बनसोडे(वय२१) यास सर्पदंश झाल्याने शिराळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास १०८ रुग्णवाहिकेतुन कोल्हापूरला  नेण्यात आले. रुग्णाची परिस्थिती गंभीर आल्याने त्याच्यावर तात्काळ उपचार होणे गरजेचे होते. मात्र संतधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सनीचा जीव धोक्यात असल्याने त्यास १०८ रुग्णवाहिकेतुन डॉ. ए. के. पाटील व चालक नागेश शिंदे यांनी कोल्हापुला नेले. वाटेत सनीचा श्वास गुदमरत होता. त्यावेळी सोबत आणारे रामचंद्र हे मुलाची नाजूक अवस्था पाहून भेदरले.त्यांना उलट्या होऊन चक्कर आली. डॉ. पाटील यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. एकाचवेळी दोघांच्यावर उपचार ही डॉक्टरांची कसरत सुरू होती.

पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प होती. तावडे हॉटेल नजीक पाणी असल्याने चालक नागेश याने उचगाव मार्गे कोल्हापुरात प्रवेश केला. वाटेत गोकुळ हॉटेल जवळ पाणी साचले होते.त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली असता पाणी गुडघ्याच्यावर असल्याचे सांगितले. रुग्णवाहिका पुढे नेली. पण पुढे गेल्यानंतर पाण्याचा अंदाज चुकला. अर्धी गाडी पाण्यात गेली.जास्त पाणी असल्याने गाडी बंद पडली तर मागे जाणे शक्य नव्हते.त्यात रूग्णाची अवस्था गंभीर होती. पर्यायी मार्गामुळे आधीच अर्धा तास उशील झाला होता. त्यामुळे चालक नागेश याने धाडशी निर्णय घेऊन पाण्यातून वाट काढली. तो थरार कोल्हापूरकरांनी पाहून कॅमेऱ्यात कैद केला.चालकाचे कौतुक केले. नागेश मुळे रुग्ण कोल्हापूर येथील सी. पी. आर. मध्ये दाखल झाला. अन सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake Bite Flood Water Ambulance Driver Nagesh Shinde Life Saving