' या ' सर्प मित्राने दिले दोन हजारांवर सर्पांना जीवदान 

विशाल गुंजवटे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

बिजवडी परिसरात विविध प्रजातींच्या सर्पांना सोडले सुरक्षितस्थळी. 

बिजवडी (जि. सातारा) : येथील सर्पमित्र रवी कदम यांनी गेल्या तीन- चार वर्षांत अंदाजे दोन हजारांवर विविध प्रजातींच्या सर्पांना पकडून सुरक्षितस्थळी सोडून जीवदान देण्याचे काम केले आहे.
 
माण तालुक्‍यासह विशेषत: बिजवडी परिसरातील पाचवड, राजवडी, हस्तनपूर, अनभुलेवाडी, मोगराळे आदी गावांत, वाड्यावस्त्यांवर कोणाच्या घरी, शेतात, छपरात सर्प निघाला तरी सर्पमित्र कदम यांना दूरध्वनी करून बोलवले जाते. तेही पटकन येऊन त्या सर्पाला पकडतात.

यात आजपर्यंत त्यांनी कमी, अतिविषारी विविध प्रजातींच्या दोन हजारांवर सर्पांना पकडून सुरक्षितस्थळी सोडण्याचे काम केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. सर्प पकडण्याबरोबरच नागरिकांनी सर्पांना घाबरू नये, तसेच त्याबाबत माहिती देत जनजागृती करण्याचेही कामही ते करतात.
 

त्यांच्या या सामाजिक कार्याचे व धाडसाचे नागरिकांकडून हाेतेय कौतुक

पाचवड (ता. माण) येथे एका ठिकाणी त्यांनी इंडीयन स्प्रॅंक्‍टॅंकिएल कोब्रा या सात फूट लांब असलेल्या अतिविषारी एका प्रजातीच्या नागाला पकडून सुरक्षितस्थळी सोडले होते. त्या वेळी तर त्या नागाला पाहताच नागरिकांच्या अंगावर शहारे उभे राहात होते. मात्र, कदम यांनी नागाला शिताफीने पकडून सुरक्षितस्थळी सोडले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे व धाडसाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. 

""सर्प हे निष्पाप असून, ते आपल्याला भीत असतात, तर आपण त्यांना भीत असतो. त्याला आपला धक्का लागला तरच ते दंश करतात. भीतीपोटी आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. कोणीही सर्प मारू नये. सापावर लक्ष ठेऊन सर्पमित्रांना बोलावून त्या सर्पांना सर्वांनी जीवनदान देत निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.'' 
- रवी कदम, सर्पमित्र, बिजवडी, ता. माण. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'This' Snake Friend Has Given Life To Two Thousand Snakes

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: