पावसामुळे वाढले साप आणि विंचू दंशाचे प्रमाण 

परशुराम कोकणे
सोमवार, 25 जून 2018

सोलापूर : पावसाला सुरवात झाल्याने अन्नाच्या शोधात साप, विंचू बाहेर पडत आहेत. गेल्या 15 दिवसांत साप आणि विंचू दंशाचे जवळपास 50 रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. दक्षता आणि उपायांची माहिती करून घेतल्यास सर्पदंशाच्या आणि मृत्यूच्या घटना टाळता येणे शक्‍य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात थोडीशी काळजी घेतल्यास सर्पदंश टाळता येऊ शकतो.

सोलापूर : पावसाला सुरवात झाल्याने अन्नाच्या शोधात साप, विंचू बाहेर पडत आहेत. गेल्या 15 दिवसांत साप आणि विंचू दंशाचे जवळपास 50 रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. दक्षता आणि उपायांची माहिती करून घेतल्यास सर्पदंशाच्या आणि मृत्यूच्या घटना टाळता येणे शक्‍य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात थोडीशी काळजी घेतल्यास सर्पदंश टाळता येऊ शकतो.

जेथे गवत मोठ्या प्रमाणावर वाढले तेथे जाण्याआधी साप किंवा त्याचे बीळ नाही ना याची खात्री करावी. गवतातून चालताना पायात बूट घालावेत. उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्‍यक आहे. शेतात कडबा उचलताना खाली साप नाही याची खात्री करावी. जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न अनेकदा उघड्यावर टाकले जाते. त्याकडे उंदिर, पाली किंवा अन्य सरपटणारे प्राणी आकर्षित होतात. उंदरांच्या वासाने साप येऊ शकतात. हे टाळण्यासाठी उरलेले अन्न दूर टाकावे. घराबाहेर अनावश्‍यक वस्तूंचा ढीग करणे टाळावे. चप्पल व शूज पायात घालण्याअगोदर तपासून मगच पायात घालावे. बागेतल्या झाडाच्या फांद्या किंवा वेली खिडक्‍यांपासून दूर ठेवाव्यात. 

झाडांवरचे सरडे, पाली घरात येऊ देऊ नयेत. ग्रामीण भागात किंवा शेतात घर असलेल्यांनी रात्री झोपताना भिंतीपासून थोडी जागा सोडून झोपावे किंवा खाली झोपणाऱ्यांनी आपल्या अंथरुणाच्या बाजूने रॉकेलचा बोळा करून रेघ ओढावी, जेणेकरून रॉकेलच्या वासाने सरपटणारे प्राणी आपल्या जवळ फिरकणार नाही. अशी काळजी घेतल्यास सर्पदंश टाळण्याचा प्रयत्न करता येईल, असे सर्प अभ्यासकांनी सांगितले. 

दक्षता घेऊनही सर्पदंश झालाच तर न घाबरता अगोदर पाण्याने दंश झालेली जागा स्वच्छ धुवून घ्यावी आणि वेळ न घालवता उपचारासाठी लगेच जवळच्या रुग्णालयात जावे. सोलापूर परिसरात मण्यार, नाग, घोणस, फुरसे, पोवळा हे विषारी साप आढळून येतात. कोणताही साप चावल्यास लगेच मृत्यू होत नाही. विषारी सापाचा दंश झाल्यानंतर किमान एक ते दीड तास आपल्याकडे वेळ असतो. लवकरात लवकर उपचार करावेत. सापाला मारू नये, सर्पमित्रांच्या माध्यमातून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून द्यावे.

- पप्पू जमादार, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल 

मांत्रिकाकडे नेल्याने झाला होता मृत्यू

सर्पदंश झालेल्या जागेवर आवळपट्टी बांधू नये. ब्लेडने चीर मारू नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे उपचारासाठी नेऊ नये. सर्पदंश झालेले दोन रुग्ण मांत्रिकाकडे उपचारासाठी नेल्यानंतर दगावल्याची घटना मंद्रूप आणि अक्कलकोट परिसरात घडली आहे.

Web Title: sneaks bite increase in rainy season