नात्याची नाळ वृद्धिंगत करणारे ठिकाण... स्नेहबंध

सुधाकर काशीद
शुक्रवार, 24 मार्च 2017

कोल्हापूर - दिनकर काकांचं वय आहे ८५ आणि रजनीताईंचं ८०. दोघांनाही मधुमेह, रक्तदाब. मुलं त्यांना व्यवस्थित बघतात; पण आता नोकरीच्या निमित्ताने मुलाला, सुनेला दीड-दोन वर्षासाठी जर्मनीला जायची संधी आली आहे. परंतु, वृद्ध आई-वडिलांना येथे सोडून गेलं तर जग काय म्हणेल, हा विचार मुलाला टोचतो आहे. या उलट ‘तुमचं तुम्ही जा, आम्ही राहू येथे कसं तरी’, ही दिनकर काका व रजनी काकींची सरळ भूमिका आहे. म्हटलं तर अडचण मोठी आहे आणि अशा अडचणी कमी-अधिक स्वरूपात अनेक कुटुंबांत आहेत. आता अशाच अडचणीवर कोल्हापुरात एक खूप चांगला मार्ग निघाला आहे.

कोल्हापूर - दिनकर काकांचं वय आहे ८५ आणि रजनीताईंचं ८०. दोघांनाही मधुमेह, रक्तदाब. मुलं त्यांना व्यवस्थित बघतात; पण आता नोकरीच्या निमित्ताने मुलाला, सुनेला दीड-दोन वर्षासाठी जर्मनीला जायची संधी आली आहे. परंतु, वृद्ध आई-वडिलांना येथे सोडून गेलं तर जग काय म्हणेल, हा विचार मुलाला टोचतो आहे. या उलट ‘तुमचं तुम्ही जा, आम्ही राहू येथे कसं तरी’, ही दिनकर काका व रजनी काकींची सरळ भूमिका आहे. म्हटलं तर अडचण मोठी आहे आणि अशा अडचणी कमी-अधिक स्वरूपात अनेक कुटुंबांत आहेत. आता अशाच अडचणीवर कोल्हापुरात एक खूप चांगला मार्ग निघाला आहे. ‘स्नेहबंध’ या माध्यमातून दिनकर काका व रजनी काकींसारख्या ज्येष्ठांना तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपात त्यांची पूर्ण काळजी घेणारा एक निवारा मिळणार आहे.

वृद्धाश्रम या शब्दाशी अजिबात न जुळणारी स्नेहबंध ही संकल्पना आहे. ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टने ती प्रत्यक्षात आणली आहे. वृद्धाश्रम हा वृद्धांना जरूर आधार आहे; पण काही ठिकाणी त्याचे चित्र चांगले तर काही ठिकाणी वाईट आहे. स्नेहबंध ही संकल्पना मात्र वेगळी आहे. कागल तालुक्‍यात मत्तिवडे-करनूर रस्त्यावर निसर्गरम्य परिसरात २० एकर जागा आहे. तेथे वृद्धांच्या केवळ शारीरिक गरजा नव्हे, तर त्यांना रमवणाऱ्या, त्यांना मानसिक आधार देणाऱ्या सुविधा आहेत. या ठिकाणी कौटुंबिक अडचण किंवा वैयक्तिक अडचण असणारे ज्येष्ठ नागरिक येऊन राहू शकतात. एवढेच नव्हे तर परदेशी जाणारी मुले आपल्या वृद्ध, अपंग आई-वडिलांना तेथे काही काळासाठी ठेवू शकतात. एवढंच काय, सात-आठ ज्येष्ठ नागरिक मिळून येथे चेंज म्हणून आठ-दहा दिवसांसाठी राहू शकतात. सामूहिक जेवण घेऊ शकतात किंवा स्वतःचे जेवण स्वतः छोट्या किचनमध्ये करू शकतात.
येथे ज्येष्ठांना गाणी म्हणायची असतील, वाद्ये वाजवायची असतील तर हॉल आहे. वाचन करायचे असेल तर लायब्ररी आहे, व्यायामशाळा आहे.

ध्यानधारणेसाठी श्री गणेश मंदिर, पारावर बसून गप्पा ठोकण्यासाठी दगडी पार आहे. एवढंच काय, केवळ कुंपणात बंदिस्त न राहता ज्येष्ठांनी बाहेरून फिरून आलं तरी चालेल, अशी व्यवस्था आहे. आता रेल्वे फाटकाजवळ स्नेहधाम या माध्यमातून हे चालूच आहे; पण स्नेहबंध हा त्या पुढचा टप्पा आहे. येथे ज्येष्ठांना वृद्धत्वाच्या जाणिवेतून लांब ठेवून जपले जाणार आहे. येत्या २७ मार्चला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. स्नेहबंध ही ज्येष्ठांच्या कुरकुरण्याची किंवा दुःखाची वास्तू न राहता तरुणांना लाजवेल, अशा स्फूर्तीची वास्तू असणार आहे.

आपण हे करू शकता...
ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टने ही वास्तू उभी केली. तेथे ज्येष्ठ राहू लागले तर तुम्ही-आम्ही त्यासाठी काय करू शकतो? एक दिवस येऊन डॉक्‍टर मंडळी त्यांचे आरोग्य तपासू शकतात, कलावंत मंडळी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करू शकतात. चित्रकार, शिल्पकार मंडळी आपल्या कलाकृती या ज्येष्ठांसमोर साकार करू शकतात.

Web Title: snehbandh sanstha