'सोच'मधून 250 पेटंटची नोंदणी

श्रीनिवास दुध्याल
रविवार, 25 मार्च 2018

''सर्वसामान्यांना परवडणारी व दिव्यांगांना उपयुक्त, कमी किमतीची, भारत सरकारच्या सुगम्य भारत उपक्रमास मदत होईल, अशी आम्ही तयार केलेली व्हीलचेअर लवकरच बाजारात उपलब्ध होईल. या संशोधनात अभिषेक पंडित, पराग औटी, डॉ. लीना औटी (सर्व रा. पुणे) व डॉ. भूषण बोरोटीकर (फ्रान्स) यांचे सहकार्य लाभले''. 
- डॉ. संदीप भागवत, फिजिओथेरपिस्ट तथा संचालक, निरामय रिहॅब, सोलापूर 

सोलापूर : नवउद्योजकांना चालना मिळावी यासाठी 'बिराक' (बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल) विशेष प्रयत्नशील आहे. 'बिराक'च्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपयुक्त व परवडणारी 40 प्रकारची आरोग्यविषयक उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत. "सोच' या स्पर्धेतून आतापर्यंत 150 नव्या पेटंटची नोंदणी झाली आहे. हा उपक्रम स्तुत्य व नावीन्यपूर्ण आहे, असे प्रतिपादन केद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. 

'बिराक'च्या सहाव्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी (ता. 20) दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. हर्षवर्धन बोलत होते. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागातर्फे, 'बिराक'ने आयोजित केलेल्या इनोव्हेशन चॅलेंज ऍवॉर्ड 'सोच' (सोल्यूशन फॉर कम्युनिटी हेल्थ) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्रातून डॉ. संदीप भागवत यांच्या टीमला पुरस्कार जाहीर झाला होता. दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात त्यांना नुकतेच पुरस्काराने गौरविण्यात आले. 

प्रसाद औटी व डॉ. संदीप भागवत यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह व शिष्यवृत्ती असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. पद्मनाभन, 'बिराक'च्या ज्येष्ठ सल्लागार व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रेणू स्वरूप, सी कॅमचे संचालक तस्लिम सय्यद यांच्यासह देशभरातून शास्त्रज्ञ, उत्पादक, संशोधक व इनोव्हेटर्स आदींची उपस्थिती होती.

Web Title: SOCH 250 Patents have been Registered Solapur