प्रविण तरडेंना अटक करा ; कोणी केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

त्सवाच्या काळात सामाजित तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष करू नये.

जत (सांगली) : दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी जाणीवपुर्वक राज्यघटनेचा अवमान केला आहे. उत्सवाच्या काळात सामाजित तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने कारवाई करून तरडेंना राज्य घटनेचा पॅटर्न दाखवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.त्यांनी  जत तहसिलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.यावेळी गौतम ऐवळे , युवराज जाधव , सचिन गायकवाड, विलास सरगर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - कोकणात जाखडीचे सूरही हरवले ; वाद्यांची विक्री फक्त २० टक्‍केच -

 

ढोणे यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या पहिल्य़ाच दिवशी गालबोट लावणारे वर्तन पुणे येथील प्रविण तरडे यांनी केले आहे. काही चित्रपटांत भुमिका केलेले तरडे हे सातत्याने वादग्रस्त कृती करत असतात. काल गणेशाची प्रतिष्ठापना करीत असताना त्यांनी भारतीय राज्यघनेचा अवमान केला आहे. त्यांनी गणेशाभोवती पुस्तकाची आरास केली, त्यात गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवली. यासंदर्भातील फोटो स्वत: तरडे यांनीच सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यांनी या कृतीतून राज्यघटनेचा अवमान केल्याचे लक्षात आलेल्या लोकांनी जाब विचारल्यावर त्यांनी पोस्ट डिलीट केली. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील वातावरण दुषित झाले आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट असताना उत्सवकाळात तरडे यांनी केलेला हा प्रकार महाराष्ट्राला परवडणारा नाही. त्यामुळे यासंदर्भात तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे.

आमच्या आकलनानुसार तरडे यांनी षडयंत्राचा भाग म्हणून राज्यघटनेच्यावर गणेशमुर्ती ठेवली. त्यांना गणेशभक्त आणि संविधानवादी समुदायात भांडण लावायचे आहे. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्राचे सामाजिक जीवन अस्थिर करण्याचा त्यांचा डाव आहे. ज्याप्रमाणे खासदार अनंतकुमार हेगडे हे वारंवार राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये करतात, त्याचप्रमाणे तरडे यांची ही प्रतिकात्मक कृती आहे. भारतीय राज्यघटनेचा अवमान करण्याबरोबरच गणरायाशी संबंध जोडून सामाजित तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो राज्य शासनाने तातडीने कारवाई करून हाणून पाडावा. पोलिसांनी स्वत: फिर्याद दाखल करून तरडे यांना तातडीने अटक करावी. त्यांना राज्यघटनेचा पॅटर्न दाखावावा, अशी विनंती आम्ही जत तालुक्यातील संविधानवादी जनतेच्यावतीने करत आहोत, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social activist Vikram Dhone demanded immediate action state constitution to Director actor Pravin Tarde