KeralaFloods: केरळमधील पूरग्रस्तांसाठी रेल्वेची सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्या धर्तीवर आता रेल्वेने सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्तांसाठी पाठविली जाणारी विविध संस्था व व्यक्‍तींची धान्य अथवा वस्तू, पाणी या स्वरूपातील मदत विनामोबदला पोच करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. 

सोलापूर : केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्या धर्तीवर आता रेल्वेने सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्तांसाठी पाठविली जाणारी विविध संस्था व व्यक्‍तींची धान्य अथवा वस्तू, पाणी या स्वरूपातील मदत विनामोबदला पोच करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. 

जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे केरळला पुराने वेढले आहे. रेल्वेसह अन्य वाहतूक सेवा ठप्प असून वीज नाही, काहींना एक-दोन वेळचे अन्नही मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणचे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना मूलभूत गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरिता केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, पूरग्रस्तांना सद्य:स्थितीत पैशांपेक्षा अन्न, कपडे आणि निवाऱ्याची अत्यंत गरज आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदत करायला तयार असलेल्या सर्वच इच्छुकांना तिथंपर्यंत पोचणे अशक्‍य आहे. त्यामुळे त्यांनी दिलेले अन्न-धान्य, कपडे यासह अन्य जीवनावश्‍यक वस्तू पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी रेल्वेने स्विकारली आहे.

पाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सज्ज 
जोरदार पावसामुळे केरळमधील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे लोकांची मागणी येताच मिरज आणि पुणे या ठिकाणांहून केरळपर्यंत तत्काळ पाणी पोच होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या असून त्या विनाथांबा केरळपर्यंत जातील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा यांनी सांगितले.

Web Title: Social commitment to rail for flood victims in Kerala