शहरात सोशल डिस्टन्सिंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपर्क कमी करा, तीन फूट लांब रहा असे वारंवार आवाहन करुनही नागरिक शहाणे होत नाहीत असे लक्षात आल्यानंतर आता प्रशासनच जागे झाले आहे. आज शहरातील सर्व दुकानांसमोर प्रशासनाने तीन फुटांवर चौकोन आखून त्यातच थांबण्याची सक्ती केल्याने सोशल डिस्टन्सिंग सुरु झाले. त्यामुळे दुकानांसमोर अशा चौकानातच नागरिक रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसत होते. 

 
सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपर्क कमी करा, तीन फूट लांब रहा असे वारंवार आवाहन करुनही नागरिक शहाणे होत नाहीत असे लक्षात आल्यानंतर आता प्रशासनच जागे झाले आहे. आज शहरातील सर्व दुकानांसमोर प्रशासनाने तीन फुटांवर चौकोन आखून त्यातच थांबण्याची सक्ती केल्याने सोशल डिस्टन्सिंग सुरु झाले. त्यामुळे दुकानांसमोर अशा चौकानातच नागरिक रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसत होते. 

कोरोनाचा विषाणू तीन फुटांपर्यंत लांब जात नाही असे तज्ज्ञांनी सांगितल्यामुळे नागरिकांनी एकमेकांचा संपर्क तीन फुटांवरुनच करावा असे आवाहन करण्यात येत होते. एकतर गर्दी करु नका, जर आवश्‍यक असेल तर दोघांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर ठेवा असे वारंवार आवाहनही करण्यात येत आहे. तरीही गेले दोन तीन दिवस नागरिकांनी बाजारात, दुकानात गर्दी करताना या सूचनेची ऐशीतैशी केली होती. त्यामुळे प्रशासनाने बाजार, दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

आज सकाळी शहरात काही भागात दुकाने, दुध डेअरी, पेट्रोलपंप सुरु होते. तेथे गर्दी होती. पण, डेअरी, दुकानांसमोर प्रत्येकी तीन फुटांवर चौकोन आखून दिले होते. त्यातच गिऱ्हाईकांनी उभे रहावे असे आवाहन दुकानदार करत होते. तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून नागरिक तीन फुट अंतर ठेवून रांगेत उभे असल्याचे चित्र शहरातील विविध दुकानांसमोर दिसत होते. हेच जर तीन चार दिवस आधी केले असते तर बरे झाले असते अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरु होती. त्यानंतर पोलिसांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. 

पेट्रोलपंपांसमोर गर्दी 
शहरात काही ठिकाणी पेट्रोलपंप सुरु होते. मात्र फक्त अत्यावश्‍यक सेवेसाठीच पेट्रोल दिले जात होते. पेट्रोलसाठी आलेल्या नागरिकांचे ओळखपत्र तपासून मगच पेट्रोल देण्यात येत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना थेट पंपासमोर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लावलेला फलक दाखवला जात होता. त्या यादीत असाल तरच पेट्रोल मिळेल असे स्पष्ट सांगण्यात येत होते. 

शहरात गर्दी कमी 
दुकाने, दुध डेअरी आणि पेट्रोलपंप वगळता शहरात इतरत्र मात्र गर्दी तुरळक होती. प्रमुख रस्ते ओसच पडले होते. पेट्रोल मिळत नसल्याने अनावश्‍यक हुंदडणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसही निवांतच होते. एखादेच वाहन तपासून सोडावे लागत होते. त्यांचाही ताण कमी झाल्याचे दिसत होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Distance in the City