पंचगंगेच्या घाटाची अशी आहेत वैशिष्ट्ये

सुधाकर काशीद
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पंचगंगा घाट परिसरात राजघराण्यातील सर्व व्यक्‍तींची समाधी मंदिरे आहेत. दगडी पायऱ्यांची घाटाची बांधणी आहे. एका वेळी चार-पाच हजार लोक घाटावर बसू शकतील एवढा ऐसपैस परिसर आहे.

कोल्हापूर - नदी म्हटलं की त्याला घाट आलाच; पण कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास आहे आणि आता तर हा घाट परिसर "प्रोफेशनल फोटोग्राफर्सना'ही भुरळ घालतो आहे. शूटिंगसाठीचे एक परफेक्‍ट डेस्टिनेशन म्हणून या घाटाकडे पाहिले जाऊ लागले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "हिरकणी' या चित्रपटातील काही प्रसंग याच घाटावर चित्रित झाले आहेत. या घाटाचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी आता विविध उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. 

मावळत्या सूर्यांचे प्रतिबिंब पाहण्याचा अनुभव न्याराच

पंचगंगा घाट परिसरात राजघराण्यातील सर्व व्यक्‍तींची समाधी मंदिरे आहेत. दगडी पायऱ्यांची घाटाची बांधणी आहे. एका वेळी चार-पाच हजार लोक घाटावर बसू शकतील एवढा ऐसपैस परिसर आहे. नदीच्या पात्रालगत दगडी शिल्पाने सजलेली मंदिरे, दीपमाळा आहेत.  काही अंतरावर शंकराचार्यांचा मठ आहे. दिवस मावळताना घाटावर मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब अनुभवणं, यासारखे दुसरे "मेडिटेशन' ते काय ? हा अनुभव नक्कीच वेगळा ठरतो. सकाळी पोहायला आणि फिरायला येणाऱ्यांची संख्याही आता येथे हळूहळू वाढते आहे. साहजिकच कोल्हापूरकरांची आरोग्यदायी सकाळ इथे जशी उजाडते, तशीच मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने एक वेगळा अनुभवही येथे घेता येतो. 

दृष्टिक्षेपात पंचगंगा घाट... 

- शहराच्या वायव्येस पंचगंगा नदीकाठी बांधलेला विस्तीर्ण घाट. 
- घाटाच्या सभोवताली व प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. 
- राजघराण्यातील व्यक्तींची स्मृती मंदिरेही येथे आहेत. 
- यापैकी सर्वात मोठे व सुंदर देवालय श्री छत्रपती तिसरे शिवाजी यांचे आहे. हे देवालय सन 1885 मध्ये बांधले आहे. 
- पंचगंगा घाटाचे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये केले असून तो विस्तीर्ण आहे. 
- घाटाचा परिसर निसर्गरम्य असून त्याच्या उत्तरेस मोठ्या कमानी असलेला शिवाजी पूल आहे. 
- येथून जवळच ब्रह्मपुरी टेकडी म्हणजे कोल्हापूर शहराच्या अतिप्राचीन पहिल्या वसाहतीचा भाग होय. 

 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social, Religious History Of The Panchganga Ghat