मुख्यमंत्री मित्र करताहेत शासकीय सुविधांचे सोशल ऑडिट !

परशुराम कोकणे
सोमवार, 16 जानेवारी 2017

"आपले सरकार'विषयी माहिती
रुग्णालये, पोलिस ठाणे, शाळा यांसह शासकीय सुविधा मिळणाऱ्या ठिकाणी जाऊन तेथील सोशल ऑडिट करणे, शासनाच्या योजनांचा प्रसार करणे आणि महाराष्ट्र शासनाच्या "आपले सरकार' या पोर्टलविषयी माहिती देण्याचे काम मुख्यमंत्री मित्रांकडून होत आहे. 

सोलापूर - ताई नमस्कार, आम्ही मुख्यमंत्री मित्र आहोत. तुम्हाला शासकीय रुग्णालयातून व्यवस्थित सुविधा मिळत आहेत का..?, काही अडचण असेल तर आम्हाला सांगा, ती आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवू..! अशाप्रकारे संवाद साधताना जर तुम्हाला कोणी दिसले तर आश्‍चर्य वाटायला नको. नागरिकांशी संवाद साधून शासकीय यंत्रणेतील चांगल्या आणि वाईट बाजू मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोचविण्याचे काम सोलापुरातील मुख्यमंत्री मित्रांकडून सुरू आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री मित्र या संकल्पनेत सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील 13 सदस्य कार्यरत आहेत. प्रा. हिंदूराव गोरे, विक्रम बायस, रविराज मुसळे, डॉ. अजित देशपांडे, सिद्धेश्‍वर टेंगळे हे गेल्या दोन आठवड्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात म्हणजे सिव्हिलमध्ये जाऊन तेथील सुविधेचे सोशल ऑडिट करीत आहेत. रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधण्यात येत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सुविधेचा दर्जा तपासण्यासाठी 10 प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. सुविधांबद्दल पाचपैकी किती गुण द्याल, हा महत्त्वाचा प्रश्‍नही विचारला जात आहे. आजवर बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, बाल आणि प्रसूती विभागास भेट देऊन तेथील रुग्ण आणि नातेवाइकांशी संवाद साधला आहे. शासकीय रुग्णालयातील सुविधांविषयी सकारात्मक चित्र असल्याचे प्रा. गोरे यांनी सांगितले.

"आपले सरकार'विषयी माहिती
रुग्णालये, पोलिस ठाणे, शाळा यांसह शासकीय सुविधा मिळणाऱ्या ठिकाणी जाऊन तेथील सोशल ऑडिट करणे, शासनाच्या योजनांचा प्रसार करणे आणि महाराष्ट्र शासनाच्या "आपले सरकार' या पोर्टलविषयी माहिती देण्याचे काम मुख्यमंत्री मित्रांकडून होत आहे. 

गेल्या दोन आठवड्यांपासून प्रत्येक शनिवारी, रविवारी शासकीय रुग्णालयात जाऊन तेथील सुविधांविषयी नागरिकांना विचारत आहोत. मोबाईल ऍपच्या माध्यमातून सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचविली जात आहे. शासकीय सुविधा घेण्यासाठी आल्यावर अधिकारी, कर्मचारी भेटतात का, वेळेवर सुविधा मिळते का, लाच मागितली जाते का, आदी 10 प्रश्‍नसह या शासकीय सुविधेसाठी पाचपैकी किती गुणांकन द्याल, असेही आम्ही विचारत आहोत. 
- प्रा. हिंदूराव गोरे, #मुख्यमंत्री_मित्र

Web Title: social worker review government schemes in solapur