सोलापूरच्या 112 निवासी डॉक्‍टरांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांना संप मागे घेऊन सेवेत सहभागी होण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्याची दखल न घेतल्याने डॉ. पोवार यांनी बुधवारी 112 निवासी डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई केली

सोलापूर - डॉक्‍टरांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ संपावर गेलेल्या 112 निवासी डॉक्‍टरांचे निलंबन करण्यात आले आहे. निवासी डॉक्‍टरांना नोटीस बजावल्यानंतर 114 पैकी फक्त दोनच डॉक्‍टर कामावर रुजू झाले. रुजू न होणाऱ्या 112 डॉक्‍टरांवर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी सांगितले.

राज्यातील डॉक्‍टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून वारंवार हल्ले होत आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी निवासी डॉक्‍टरांनी संप सुरू केला आहे. यामुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत असल्याने संप बुधवारी सकाळपर्यंत संप मागे घ्यावा, असे आवाहन न्यायालयाने केले होते. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांना संप मागे घेऊन सेवेत सहभागी होण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्याची दखल न घेतल्याने डॉ. पोवार यांनी बुधवारी 112 निवासी डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई केली. संपाचा परिणाम रूग्णसेवेवर होऊ नये म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील पूूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, सहा प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक सेवा बजावत आहेत.

Web Title: Solapur : 112 residential doctos suspended