सोलापूर: प्रशासकीयनंतर आता रंगणार राजकीय कुरघोड्या

Solapur
Solapur

सोलापूर : राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीच प्रशासकीय आणि न्यायालयीन कुरघोड्यांनी सोलापूरसह महाराष्ट्र ढवळून निघाला होता. मुदतवाढ, शेतकरी मतदानाचा कायदा या सर्व प्रक्रिया पार पाडत आता बाजार समितीची निवडणूक होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. या निवडणुकीसाठी आता समविचारींना सोबत घेण्यावरून राजकीय कुरघोड्यांना वेग येणार आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख या भाजप नेत्यांसह कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्यावर कर्नाटकच्या निवडणुकांची जबाबदारी होती. कर्नाटक निवडणुकीमुळे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा राजकीय विषय थोडा अडगळीत पडला होता. कर्नाटकसाठी मतदान झाल्याने आता बाजार समितीच्या राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. निवडणूक शाखेने जाहीर केलेली प्रारूप मतदार यादी 14 किंवा 15 मे रोजी अंतिम होणार आहे. मतदार यादी अंतिम झाल्यावर तातडीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

बाजार समितीत यापूर्वी झालेला गैरव्यवहार व शेतकऱ्यांना भाजप सरकारने दिलेला मतदानाचा अधिकार या दोन मुद्यांवर भाजप व समविचारी कॉंग्रेस व समविचारींवर हल्लाबोल करणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले बेदाणा मार्केट, एक रुपयांमध्ये जेवण, बाजार समितीमधील रोखलेल्या चोऱ्या, डाळिंबाला मिळवून दिलेली बाजारपेठ या विकासाच्या मुद्यावर कॉंग्रेस भाजपला टक्कर देणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होणाऱ्या या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस व भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, बळिराम साठे यांच्यासह समविचारी आम्ही लवकरच एकत्रित बैठक घेणार आहोत. या बैठकीत रणनीती ठरविली जाईल. सुशीलकुमार शिंदे सांगतील त्यानुसार सर्वानुमते एकत्रित येऊन बाजार समितीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ. 
- दिलीप माने, माजी सभापती, बाजार समिती 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आमची प्राथमिक बैठक झाली आहे. सहकारमंत्री देशमुख यांची वेळ घेऊन पुन्हा बैठक घेतली जाईल. गाव पातळीवर जाऊन सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. सध्या आमच्या बाजूने वातावरण असून यापूर्वी समितीत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीत भ्रष्टाचार केला आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीत भाजपने हक्काने स्थान दिले आहे. 
- शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष, भाजप 

समविचारी म्हणजे नेमका कोण? 

कॉंग्रेस आणि भाजपला मित्रपक्षाचा आधार घेतल्या शिवाय बाजार समितीचा गढ सर करता येणे कठीण आहे. दोघांचीही भर समविचारीवर असल्याने आता नेमका कोणाचा समविचारी कोण? हा मुद्दा येत्या काळात राजकीय कुरघोड्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची या निवडणुकीसाठी असलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे. कोणासोबत कोण जाणार? याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com