सोलापूर चादर होणार नामशेष ! (व्हिडिओ)

सोलापूर चादर होणार नामशेष ! (व्हिडिओ)

सोलापूर : घरात सोलापुरी चादर नाही, असं घर महाराष्ट्रात सापडणार नाही. देशभर आणि देशाबाहेरही पोचलेल्या अस्सल सोलापुरी चादरी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याचे कारण सोलापुरी चादरींपुढे नकली सोलापुरी चादरींचे आव्हान उभे ठाकले आहे. यातून या चादरींचे उत्पादन आता केवळ १० टक्‍क्‍यांवर आले आहे. "जीआय' (जिऑग्राफिकल इंडिकेशन) प्राप्त सोलापुरी चादर अख्ख्या जगात नावाजली गेली. चादर म्हणजे सोलापूर अशी ओळख होती. 

कोल्हापूर, सांगली आदी भागांतील पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व संघटनांकडून सोलापुरी चादरींची मागणी आहे. मात्र, चादर निर्मात्या सोलापुरात केवळ दोन लाख चादरी उपलब्ध झाल्या. उर्वरित चादरींसाठी संस्थांना सोलापूरची नक्कल असलेल्या चादरींवर अवलंबून राहावे लागले. या प्रकारामुळे चादरींसाठी ओळख असलेल्या सोलापुरातील चादरींची उत्पादने कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता ही प्रसिद्ध सोलापुरी चादर नामशेष होते की, काय अशी भीती निर्माण झाली आहे.

सोलापुरात 20 वर्षांपूर्वी यंत्रमागावर 80 टक्के उत्पादने ही चादरींची असायची. कारण, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतची पसंती या चादरींना होती. 10 ते 12 हजार यंत्रमागांवर उत्पादने व्हायची. एका मागावर दिवसा 15 चादरी अशा प्रकारे दीड लाख चादरी तयार व्हायच्या. आज 700 ते 800 मागांवर 10 हजारच्या आसपास चादरी तयार होत आहेत. उत्पादनाची सरासरी 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. 

उत्पादने कमी होण्याची कारणे 
* बदलत्या जीवनशैलीमुळे फॅशनेबल, प्रिंटेड बेडशीट, ब्लॅंकेट, प्लास्टिक चटईंना वाढली मागणी 
* सोलापुरी चादर वजनदार, १०-१२ वर्षे टिकणारी; मात्र सध्या वजनाने हलक्‍या, आकर्षक, "यूज अँड थ्रो'च्या विचाराने कमी दर्जाच्या, कमी किमतीच्या चादरींना वाढली मागणी 
* जीआय मानांकन मिळालेल्या सोलापुरी चादरीची पानिपत, इरोड, करुर येथे नक्कल होत असल्याने अस्सल सोलापुरी ऊबदार चादरींना होतेय मागणी कमी 
* किचकट पण कौशल्यपूर्ण उत्पादने घेणारे कामगार सध्या होत नाहीत उपलब्ध 
* आवश्‍यक असताना शासकीय मदत मिळाली नसल्यानेही चादर उत्पादकांनी कमी केली उत्पादने 



विविध कारणांमुळे सोलापुरातील चादर उत्पादन कमी झाले आहे. त्यात नकली चादरींची उत्पादने हे कारण अधोरेखित करावे लागेल. 20 वर्षांपूर्वी 12 हजार यंत्रमागांवर चादरींची उत्पादने होत होती. आता मागणी असलेल्या टेरी टॉवेलची उत्पादने 12 हजार यंत्रमागांवर घेतली जात आहेत. - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ 

जीआय मानांकन मिळाले असताना मार्केटिंगकडे दुर्लक्ष झाले. सोलापुरी चादरीचे नक्कल केलेल्या चादरी स्वस्तात बाजारात आल्याने अस्सल चादरीला मागणी कमी होत गेली. ज्या उत्पादनांना मागणी जास्त व दर जास्त ती उत्पादने घेण्याकडे येथील उद्योजकांचा कल वाढला आहे. - काशिनाथ कुंटला, यंत्रमागधारक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com