पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचे सोलापूर कनेक्‍शन; भाजप नेत्याच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. तपासामध्ये बापू राजगुरु याचे फेसबुक अकाउंट हॅक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भातील चौकशीकरिता राजगुरु व त्याच्या कुटूंबातील सदस्याला बोलावून घेतले आहे. 
- वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक

सोलापूर : टेंभूर्णी (ता. माढा) परिसरातील बापू कुबेर राजगुरु या तरुणाचे फेसबुक अकाउंट हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी बापू राजगुरु यास चौकशीसाठी बोलाविल्याची माहिती पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सकाळशी बोलताना दिली. 

मूळचा अकोला येथील बापू राजगुरु हा टेंभूर्णी परिसरात राहण्यास होता. त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची पोस्ट करण्यात आली होती. या संदर्भातील चौकशी करत गाझियाबाद पोलिस राजगुरु याच्यापर्यंत पोचले. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीची कोणतीही पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली नाही, मला हिंदी भाषा सुद्धा येत नाही असे राजगुरु याने पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटची तपासणी केली. त्याचे अकाऊंट हॅक करून कोणीतरी पंतप्रधानांविषयी पोस्ट टाकल्याचे उघड झाले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाचे सोलापूर कनेक्‍शन? चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात.. अशी पोस्ट भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी फेसबुकवर शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पोस्ट केलेली एक व्यक्ती टेंभुर्णी परिसरात होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती कळाल्याने फेसबुकवर पोस्ट केल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. तपासामध्ये बापू राजगुरु याचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भातील चौकशीकरिता राजगुरु व त्याच्या कुटूंबातील सदस्याला बोलावून घेतले आहे. 
- वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक

Web Title: solapur bjp leader facebook post about PM Modi Assassination Plot gone viral