भाजपमध्ये ‘मालक’शाहीविरुद्ध धुसफूस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सोलापूर - गेली २५ वर्षे भाजपची ओझी उचलणाऱ्या निष्ठावंतांच्या खांद्यावर प्रचाराचा झेंडा सोपवून उमेदवारीचा टिळा ऐनवेळी पक्षात आलेल्या ‘उपऱ्यां’ना लावल्याने पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. हा सारा प्रकार भाजपच्या विरोधकांच्या सोयीसाठी, काही प्रभागात भाजप वाढू नये, यासाठी केला जातोय का, असा सवाल निष्ठावंत उपस्थित करत आहेत. त्यांच्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याची खदखद वाढली आहे. या ‘मालक’शाहीविरुद्ध बंडाचा झेंडा फडकण्याची चिन्हे दिसत आहेत. 

भाजपने आयारामांनाच उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर वाढला आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडूनही अन्याय होत असल्याची भावना उघडपणे व्यक्त केली जात आहे. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक सातमध्ये आयात केलेल्यांना पक्षाने संधी देऊन निष्ठावंतांना डावलले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोईचे राजकारण या प्रभागात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले असल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी नोंदविले. विधानसभा निवडणुकीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून महापालिकेची उमेदवारी निश्‍चित केली असल्याचीही चर्चा भाजप कार्यकर्त्यांत सुरू आहे. निष्ठावंतांना डावलल्याने ‘मालक’शाहीविरुद्धचा लढा तीव्र होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याचा फटका या निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

प्रभाग सातमध्ये भाजपकडून वनिता मोटे, मनीषा कणसे, अरुण जाधव, श्रीकांत घाडगे यांना उमेदवारी दिली आहे. चारपैकी तीन उमेदवार उपरे आहेत. त्याच प्रभागात भाजपचे निष्ठावंत असलेले धनेश हिरेहब्बू, अनुजा कुलकर्णी, सतीश कुदळे, संदीप जाधव यांना पक्षाने डावलले आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी पत्रक काढून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने स्वपक्षातील कार्यकर्त्यांना संपविण्याचे राजकारण सुरू केले असल्याचे सांगत या प्रभागातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे उमेदवारी डावललेल्या कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

‘पार्टी विथ डिफरन्ट’
भाजप ‘पार्टी विथ डिफरन्ट’चा नारा देतो आणि त्यांनी उमेदवारी देताना इतर पक्षांहून वेगळी भूमिका घेतली असल्याचा टोला निष्ठावंतांकडून हाणला जात आहे. इतर सर्व पक्ष निष्ठावंतांना संधी देत असताना ‘डिफरन्ट’ पार्टी उपऱ्यांना टिळा लावत असल्याने फटका बसेल, असा सूचक इशाराही कार्यकर्ते देत आहेत. 

Web Title: solapur bjp politics