सोलापुरात मतदारच दाखवतील "कमळा'ला "हात' 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. "विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार "कमळा'ला "हात' दाखविल्यास कुणालाही आश्‍चर्य वाटणार नाही. 

सोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. "विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार "कमळा'ला "हात' दाखविल्यास कुणालाही आश्‍चर्य वाटणार नाही. 

संपूर्ण सोलापूर शहरात एलईडी दिव्यांचा लखलखाट करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे पाठविला. त्यावर सभागृहात चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी हा विषय प्रलंबित ठेवण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मांडली आणि स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या सोलापूरकरांचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले. भाजपची महापालिकेतील गटबाजी संपली असा दावा मात्र खोटा ठरला. 

आयुक्तांनी या कामाचा मक्ता स्वतःच्या सोईनुसार मंजूर करून सभागृहाकडे पाठविला असा दावा केला जात आहे. मात्र हा विषय सभागृहात चर्चेला आला असता तर कुणाचे चुकले आणि कुणाचे बरोबर हे सर्वांसमोर आले असते. विषय प्रलंबित ठेवून काहीच साध्य होणार नाही, उलट त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसानच होणार आहे हे सत्ताधाऱ्यांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. एलईडी दिवे बसविण्याचा मक्ता कर्नाटकमधील कंपनीला दिल्याचे समजल्यापासून काही जणांनी सुरवातीपासूनच विरोध सुरु केला. त्यांचा विरोध समजण्यासारखा आहे. मात्र त्याबाबत संबंधितांनी सभागृहात चिरफाड करणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता वेगळ्या पद्धतीने हा विषय हाताळण्याचे प्रयत्न होत असल्याने भाजपच्याच राजेश काळे यांनी, "कमिशनसाठी प्रस्ताव थांबवला' अशी प्रतिक्रिया देत घरचा आहेर दिला. 

आजच्या घडीला शहर विकास आणि कोट्यवधी रुपयांच्या योजनांचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावर निर्णय घेण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांमध्ये नाही का असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. एखाद्या विषयाला पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला, की सहकारमंत्री गटाच्या नगरसेवकांचा विरोध ठरलेला आहे. या दोघांच्या भांडणांत विरोधकांची भूमिकाही स्पष्ट नाही. त्यामुळे शहर विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. पारदर्शक कारभाराचा दिंडोरा पिटणाऱ्या भाजपच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना सोलापुरातील या प्रकाराची माहिती नाही, असे नाही. मात्र त्यांच्याकडूनही "आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा' अशी भूमिका घेतली जात आहे. वरिष्ठांचीही हीच भूमिका राहिली तर त्याचे भविष्यात मोठे परिणाम भाजपला भोगावे लागतील, इतकेच. 

मतदारांचा झाला अपेक्षाभंग 

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर "अच्छे दिन' येतील अशी सोलापूरकरांची अपेक्षा होती. मात्र दोन्ही मंत्र्यांच्या भांडणात शहरवासियांना "बुरे दिन'चा अनुभव घ्यावा लागत आहे. पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही, त्यामुळे प्रशासनाकडून अपेक्षित उद्दीष्टही पूर्ण होत नाही. चांगले रस्ते, मुबलक पाणी आणि दिवाबत्ती या परिपूर्ण सुविधाही देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. 

Web Title: In Solapur Bjp will loose election