सोलापूर काँग्रेसचा "फ्लॉप शो'

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 1 जून 2018

सोलापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात झालेला काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचा उल्लेख "फ्लॉप शो' म्हणूनच करावा लागेल. विस्कळित नियोजन आणि गर्दीचा अभाव हे त्याला कारणीभूत ठरले.

सोलापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात झालेला काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचा उल्लेख "फ्लॉप शो' म्हणूनच करावा लागेल. विस्कळित नियोजन आणि गर्दीचा अभाव हे त्याला कारणीभूत ठरले.

सरकारने जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याची जाणीव मतदारांना करून देण्यात काँग्रेसला काही प्रमाणात यश येऊ लागले असतानाच, सोलापूर शहरात झालेला मेळावा म्हणजे "फ्लॉप शो' ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे. हा मेळावा शहर पातळीवर होता, मात्र मेळाव्यास अपेक्षित गर्दी जमविण्यास संयोजकांना यश आले नाही. मेळावा दुपारी तीन वाजता असताना प्रमुख पाहुणे सायंकाळी सहा वाजता आले. दरम्यानच्या काळात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह माजी महापौर नलिनी चंदेले, रियाज हुंडेकरी व केशव इंगळे यांनी जोरदार "बॅटिंग' केली. विद्यमान सरकारच्या विरोधात प्रभावी मुद्दे या वक्‍त्यांनी मांडले, मात्र त्यातील गांभीर्य जाणणारे श्रोतेच समोर नव्हते. त्यामुळे वक्‍त्यांनी बोलायचे आणि ऐकणाऱ्यांनी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे, असे दृश्‍य दिसले. 

सभागृहात भाषणबाजी सुरू असताना अनेक पदाधिकरी, आजी-माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते बाहेर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व त्यांच्या टीमच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते. त्यामुळे सभागृहातील मागील खुर्च्या रिकाम्या होत्या. साधारण पाच-सव्वापाचच्या सुमारास सोशल मीडियाचा वर्ग सुरू झाला. त्या वेळी आमदार शिंदे प्रेक्षकांत येऊन बसल्या. तर व्यासपाठीवरील उर्वरित मान्यवर सभागृहाबाहेर गेले, त्यामुळे व्यासपीठावर एकटेच बसलेल्या सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना "संवादा'साठी मोबाईलला जवळ करावे लागले. "टीम प्रदेशाध्यक्ष' आल्यानंतर मात्र व्यासपीठावर जणू "भरती' आली. खुर्च्या नसतानाही काही जणांनी खालील खुर्च्या मागवून पाठीमागच्या बाजूला ठिय्या मांडला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, श्री. चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे अशी दिग्गज मंडळी असतानाही सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी यांच्यासह बोलण्यासाठी इच्छुक असलेल्यांना "मौनी'बाबा व्हावे लागले. नेतेगण आल्यावर भाषणबाजी रंगेल आणि कार्यकर्त्यांत उत्साह येईल असे वाटत होते. प्रत्यक्षात उशीर झाल्याचे कारण देत हा मेळावा अक्षरशः गुंडाळला. त्या वेळी कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला. 

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करून शहर उत्तरमध्ये वातावरण निर्मिती करायची असे नियोजन होते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराची अनामतही जप्त झाल्याने, यंदा इच्छुक असलेल्यांनी त्याचे भांडवल करण्यास सुरवात केली आहे. मात्र अशा "डावपेचां'चा फटका काँग्रेसला बसू शकतो, त्यामुळे वरिष्ठांनी त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्‍यक असल्याचे मत एकनिष्ठ कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Solapur Congress's "Flop Show"