सोलापूर महापालिका बंद करणार तोट्या नसलेले नळजोड 

विजयकुमार सोनवणे 
रविवार, 17 जून 2018

सोलापूर: शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर तोट्या नसलेले खासगी नळजोड बंद करण्यात येणार आहेत. तोट्या बसविण्यासाठी आठ दिवसांची (ता. 23 जून) मुदत देण्यात आली असून, तोट्या न बसविल्यास दंडात्मक कारवाईही होणार आहे. 

सोलापूर: शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर तोट्या नसलेले खासगी नळजोड बंद करण्यात येणार आहेत. तोट्या बसविण्यासाठी आठ दिवसांची (ता. 23 जून) मुदत देण्यात आली असून, तोट्या न बसविल्यास दंडात्मक कारवाईही होणार आहे. 

सोलापूर शहराला सध्या तीन दिवसांआड, कधीकधी चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत अनेक ठिकाणी तोट्या नसलेल्या खासगी नळांतून सातत्याने पाणी वहात असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाणी तर वाया जातेच, शिवाय हे पाणी खड्ड्यामध्ये साचून ते दूषित होण्याची शक्‍यताही असते. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने घर किंवा व्यावसायिक ठिकाणी असलेल्या खासगी नळाला तोटी नसेल तर ते बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

तीन किंवा चार दिवसांआड पाणीपुरवठा असल्याने काहीवेळेला जादा वेळ पाणी सोडले जाते. अशा वेळी अनेक नागरिक वाहने धुणे, परिसर धुणे असा प्रकार करतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी घरगुती नळाच्या तोट्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरातील पाणी भरून झाले तरी, तोटी नसल्याने त्या नळातून सातत्याने पाणी वहातच असते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय तर होतोच शिवाय, रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार होतात. हे पाणी ड्रेनेजच्या पाण्यात मिसळले तर अनारोग्याची स्थिती निर्माण होऊ शकते. महापालिकेने हा आदेश काढला तरी, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत पाणी यायच्या दिवशी अचानकपणे तपासणी केली गेली तर, अनेक ठिकाणी तोट्या नसलेले नळ दिसून येतील. 

नळजोडाचा गोषवारा (शहर हद्द) 
एकूण मिळकती : 96821 
एकूण नळजोड: 54240 
अर्धा इंची घरगुती : 51850 
अर्धा इंची व्यावसायिक : 1619 
पाऊणइंची घरगुती : 541 
पाऊणइंची व्यावसायिक : 230

Web Title: solapur corporation ban tap without cock