शाळेतील पुस्तकांसाठी 'डीबीटी' रद्द

संतोष सिरसट
शनिवार, 30 डिसेंबर 2017

सोलापूर - राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. या पुस्तकांसाठी शासनाने "डीबीटी' (थेट लाभ हस्तांतर) योजना लागू केली होती. मात्र, 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तक योजनेला "डीबीटी'तून सूट दिली होती. आता शासनाने मोफत पाठ्यपुस्तकांसाठी असलेली "डीबीटी'ची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुस्तक वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाने गेल्यावर्षी पाच डिसेंबरला लाभाच्या वस्तू थेट स्वरूपात न देता त्याचे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लाभाच्या योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात (डीबीटी) जमा करण्यास सुरवात झाली आहे. या निर्णयामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्याचवेळी शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजनांचे पैसेही त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला. त्यानुषंगाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. पाठ्यपुस्तकांना या योजनेतून केवळ 2017-18 या वर्षासाठी वगळण्याचा निर्णय शासनाने मार्च महिन्यात घेतला होता.

मोफत पाठ्यपुस्तके योजना डीबीटीतून वगळण्याचा प्रस्ताव बालभारतीने 14 डिसेंबरला शासनाला दिला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, यामुळे मोफत दिली जाणारी पाठ्यपुस्तके आता थेट शाळा स्तरावर मिळणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी पूर्वीच्या पद्धतीने करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांना दिल्या आहेत.

Web Title: solapur dbt cancel for news school