सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सोलापूर - यंदाच्या हंगामातील निम्मा पावसाळा संपला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. मागील दोन-चार दिवसांपासून रोजच काळेकुट्ट ढग आकाशात येतात. मात्र, ते ढग पावसाचे नसून दुष्काळाचे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जून ते सात ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांपैक्षी आठ तालुक्‍यांमध्ये 50 टक्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या आकडेवारीवरून दुष्काळाचे ढग गडद होत असल्याचे जाणवते.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 488 मिलिमीटर पाऊस पडतो. यापैकी मागील दोन महिन्यांत सरासरी 226 मिलिमीटर पाऊस पडण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 110 मिलिमीटर पावसाचीच नोंद प्रशासनाकडे झाली. एक-दोन तालुक्‍यांचा अपवाद वगळता प्रत्येक तालुक्‍यात 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या सरासरी एकूण पावसाचा विचार केला असता केवळ 48 टक्केच पाऊस झाला आहे. सुरवातीच्या काळातही मोठा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थोड्या पावसाच्या जिवावर खरिपाची पेरणी उरकली. पण, आता पाऊसच नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Solapur District Drought rain