सोलापुरात गाळेधारकांनी केली अतिक्रमणाची उड्डाणे

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 5 जुलै 2018

महत्त्वाच्या व्यक्ती व संस्थांची यादी 
(स्त्रोत : भूमी व मालमत्ता विभाग, महापालिका) 
व्यक्ती, संस्था मंजूर जागा प्रत्यक्षात मोजमाप 
(चौरस फूट) (चौरस फूट) 
गुलाब बारड 15 150 
जव्हेरीलाल कोठारी 25 312 
इकरारअली सोशल 1480 3268 
बाळासाहेब पुणेकर 60 475 
शिवलाल आळसंदे 100 11000 
विश्‍वनाथ चाकोते 48 480 
प्रकाश स्वीट मार्ट 760 1540

सोलापूर : महापालिकेत ठराव केल्यानुसार जागेचा विकास न करता मंजूर जागेच्या शंभर ते सव्वाशे पट जागा लाटण्याचा प्रकार बहुतांश खुली जागा व गाळेधारकांनी केल्याचे महापालिकेच्या यादीतून स्पष्ट होते. अतिक्रमण करणाऱ्यांत काही आजी-माजी लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. किरकोळ अतिक्रमणे काढताना कर्तृत्वाचा झेंडा फडकाविल्याचा आव आणणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथक आणि बांधकाम विभागाला दिग्गजांनी केलेली अवाढव्य बांधकामे दिसली नाहीत का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. 

एखाद्या संस्थेला 40 ते 80 चौरस फूट जागा मंजूर झाली असेल तर, संबंधितांनी थेट 400 ते 480 चौरस फूट जागेचा वापर केल्याचे प्रत्यक्ष मोजणी करताना आढळले आहे. भाडे मात्र मंजूर जागेइतकेच महापालिकेस भरले जात आहे. त्यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कुंभार वेस येथील मारुती देवस्थान पंच समितीला 2030.50 चौरस फूट जागा पूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. या ठिकाणी समितीने पोटभाडेकरू ठेवले आहेत. समितीला भाडे मिळते. पालिकेला मात्र काहीच उत्पन्न नाही, असे कागदोपत्री स्पष्ट होते. 

उत्तर कसबामधील लोकमान्य टिळक मंडळास 49 चौरस फूट जागा मंजूर असताना, प्रत्यक्षात 196 चौरस फुटाचा वापर मंडळाकडून केला जात आहे. उत्तर सदर बझार येथील नवशक्ती तरुण मंडळाला 538 चौरस फूट जागा मंजूर केली असता, प्रत्यक्षात 1326 चौरस फूट जागेचा वापर केला जात आहे. रेल्वे लाइन्स येथील दंडवते गोविंदराज यांना देवस्थानसाठी 393.50 चौरस फूट जागा मंजूर असताना प्रत्यक्षात 2108 व 840 चौरस फूट जागेचा वापर सुरू असल्याचे नमूद आहे. 

सिद्धेश्‍वर पेठ येथे इंडो-तिबेटीयन मार्केट असोसिएशनला 640 चौरस फूट जागा दिली असताना प्रत्यक्षात 1660 चौरस फूट जागेचा वापर होत आहे. याबाबत आवश्‍यक कार्यवाही सुरू आहे. महापालिका शाळा क्रमांक 27 येथे राजे जिजामाता मंडळास 200 चौरस फूट जागा दिली असताना 390 चौरस फूट, रविवार पेठेत उमा माहेश्‍वरी मंडळास 200 चौरस फूट जागा दिली असता प्रत्यक्षात 500 चौरस फूट, शनिवार पेठेतील नागोबा मंदिरास 825 चौरस फूट जागा दिली असता प्रत्यक्षात वापर मात्र 1035 चौरस फुटांचा, बेगम पेठेतील इब्राहीम शहापुरे यांना 74 चौरस फूट जागा दिली असता प्रत्यक्षात 108 चौरस फूट जागेचा, जोहरबी मुजावर यांना 350 चौरस फूट जागा मंजूर असताना प्रत्यक्षात 517 चौरस फूट जागेचा वापर केला जात आहे. एकूणच मंजूर जागेपेक्षा जास्त जागा वापरण्याकडे बहुतांश जागा मिळवलेल्यांचा कल आहे. यातील अनेकांची मुदत संपून अनेक वर्षे उलटली, मात्र त्या जागा ताब्यात घेण्यात आल्याच नाहीत. 

महत्त्वाच्या व्यक्ती व संस्थांची यादी 
(स्त्रोत : भूमी व मालमत्ता विभाग, महापालिका) 
व्यक्ती, संस्था मंजूर जागा प्रत्यक्षात मोजमाप 
(चौरस फूट) (चौरस फूट) 
गुलाब बारड 15 150 
जव्हेरीलाल कोठारी 25 312 
इकरारअली सोशल 1480 3268 
बाळासाहेब पुणेकर 60 475 
शिवलाल आळसंदे 100 11000 
विश्‍वनाथ चाकोते 48 480 
प्रकाश स्वीट मार्ट 760 1540

Web Title: solapur encroachment