'...तर सोलापुरात एमआयएम फोफावली नसती'

विजयकुमार सोनवणे
रविवार, 28 जुलै 2019

वारंवार मागणी करूनही मुस्लिम समाजाला डावलण्यात आल्याने प्रचंड नाराजी होती. त्यातूनच एमआयएमला बळ मिळाले आणि हा पक्ष सोलापुरात प्रबळ झाला. पहिल्याच वेळी महापालिकेच्या नऊ जागा जिंकणे शक्य नाही, मात्र मुस्लीमांमधील नाराजीमुळे ते प्रत्यक्षात आले.
- अॅड. यू. एन. बेरिया, माजी महापौर

सोलापूर : गेल्या काही निवडणुकांत मुस्लीम समाजाला उमेदवारी मिळाली असती तर सोलापुरात एमआयएम फोफावली नसती, असा दावा माजी महापौर यू. एन. बेरिया यांनी केला. त्याचवेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघावरील दावा सोडून मोहोळला निवडणूक लढवावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

अनेक वर्षांपासून कॅांग्रेसच्या पाठिशी असलेल्या मोची समाजाने यंदा आक्रमक भूमिका घेत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघावर दावा केला. त्या पाठोपाठ मुस्लीम समाजानेही या मतदारसंघावर दावा केल्याने आमदार शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ऍड. बेरिया यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका विशद केली. 

बेरिया म्हणाले, मला उमेदवारी मिळावी ही मागणी नाही. या मतदारसंघातील अनेक मुस्लीम नेते इच्छुक आहेत. पक्ष ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्याचा निर्णय श्रेष्ठींनी घ्यावा पण मुस्लीम समाजालाच उमेदवारी मिळावी. ही मागणी नवीन नाही. गेल्या
अनेक निवडणुकांत ही मागणी केली आहे. आमच्या समाजातील अनेक नेते हे सुशीलकुमार शिंदे यांचे नेतृत्व मान्य करणारे आहेत. या मतदारसंघात मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली तर त्यास निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.

मोहोळ मतदारसंघ हा अनुसूचित जाती मोर्चासाठी राखीव आहे. हा मतदारसंघ कॅंाग्रेस आणि आमदार शिंदे यांच्यासाठीही अनुकूल आहे. त्यामुळे शिंदे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास त्या निश्चित विजयी होतील, शिवाय मध्य मतदारसंघात मुस्लीम समाजाला उमेदवारी मिळाल्याने त्याचाही फायदा जिल्ह्यातील इतर मतदारसंघात कॅंाग्रेसला होईल, असेही बेरिया म्हणाले.

वारंवार मागणी करूनही मुस्लिम समाजाला डावलण्यात आल्याने प्रचंड नाराजी होती. त्यातूनच एमआयएमला बळ मिळाले आणि हा पक्ष सोलापुरात प्रबळ झाला. पहिल्याच वेळी महापालिकेच्या नऊ जागा जिंकणे शक्य नाही, मात्र मुस्लीमांमधील नाराजीमुळे ते प्रत्यक्षात आले.
- अॅड. यू. एन. बेरिया, माजी महापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur ex mayor UN Baria talked about MIM