सांगोल्यातील अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित

solapur farmers deprived from crop insurance
solapur farmers deprived from crop insurance

संगेवाडी, जि. सोलापूर : सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना ऐन दुष्काळातही विमा रक्कम भरुनही पिकविमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगोल्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील विमा भरलेल्या एकाही शेतकऱ्याला विमा रक्कम मिळाली नाही.

दुष्काळात शासन शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना करीत असते. तालुक्यातील शेती निसर्गाच्य भरवशावर असल्याने शेतकरी प्रत्येक वर्षी आपल्या पिकाचा विमा उतरवत असतो. परंतु ऐन दुष्काळातही अनेक शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही. पिक विमा रक्कमेसाठी शेतकरी बँकांच्या पायऱ्या सतत झिजवत आहेत. सांगोल्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील 435 शेतकऱ्यांपैकी पिकविमा भरलेल्या एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. एकट्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये पंच्चावन्न लाख रुपये पिकविमा रक्कम भरली आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेचा विमा भरलेला असताना शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. शेतकरी बँकेमधील अधिकाऱ्यांना विम्यासाठी चौकशी करीत असले त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावावर कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्यांनी बाहेर रोखीने पिकविमा भरला. रोखीने विमा रक्कम भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. तालुक्यात मोठा दुष्काळ असुनही विमा रक्कम मिळत नसल्याने शासन आणि विमा कंपनीमध्ये साटेलोटे असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. विमा रक्कम मिळविण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींंनी प्रयत्न करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

आमच्या शाखेमध्ये विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. विम्यासाठी आम्ही वरीष्ठ आधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळेल परंतू त्यासाठी थोडा कालावधी लागेल. 
- व्ही. ए. नाळे (कृषी अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-सांगोला)

विमा कंपनी व बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कसलीच माहिती मिळत नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधींंनी याविषयी लक्ष घालून शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून द्यावी. 
- धनंजय चव्हाण, (शेतकरी, हालदहिवडी)

ऐन दुष्काळात आमच्या डाळिंबाच्या बागा वाया गेल्या. अनेक शेतकऱ्यांना डाळिंब तर आले नाही, परंतु झाडेही जळू लागले आहेत. अशा परिस्थितीत तरी विमा रक्कम मिळायला हवी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. 
- दीपक खंडागळे, (डाळिंब उत्पादक शेतकरी, संगेवाडी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com