काहीही झालं तरी फळबागा जगवायच्याच; शेतकऱ्यांचा निर्धार!

काहीही झालं तरी फळबागा जगवायच्याच; शेतकऱ्यांचा निर्धार!

पोथरे (सोलापूर) : निसर्गानं अन्याय केला असला, तरीही शेतकर्‍यांनी हार मानलेली नाही. शेतीला जगविण्यासाठी सुरू असलेल्या लढाईमध्ये काही शेतकरी यशस्वी होतात, तर काही अयशस्वी! पण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, हे नक्की आहे.. पोथरे आणि परिसरातील फळबागा जगविण्यासाठी आहेत त्या विहिरी खोल करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत, तर काही ठिकाणी नव्याने विहिरी घेतल्या जात आहेत. पण अनेक ठिकाणी पाणीच लागत नसल्यामुळे घोर निराशा होत आहे.

करमाळा तालुक्यात पूर्व व उत्तर भागात शेतकऱ्यांनी उसाला पर्याय म्हणून लिंबोनी, दाळिंब, चिंकू, सीताफळ यासारख्या फळबागा मोठ्या प्रमाणात लावल्या आहेत. परंतु दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचे सर्व स्तोत्र बंद पडल्याने फळबागा जगविणे कठीण झाले आहे. सध्या 58 रुपये फुटाने बोअरवेल घेत असून तो तीनशे ते साडेतीनशे फूट घ्यावा लागत असून पाईपसह एका बोरला 25 ते 30 हजार रुपये खर्च येत आहे.

विहीर खोदण्यासाठी एका परसाला (सात फूट) 60 ते 70 हजार रुपये खर्च येत आहे. एवढा खर्च करूनही पाणी लागेल याची शाश्वती नाही व लागलेले पाणी टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. अशा स्थितीतही शेतकरी मात्र फळबाग जगवण्यासाठी कर्ज काढून पाण्यासाठी धडपड करत आहे.

'माझ्याकडे पाच एकर लिंबोनिचे फळबाग आहे मी तीन बोअरवेल घेतले परंतु पाणी लागले नाही. फळबाग टिकली नाही तर मोठे नुकसान होणार आहे. '
- हरिश्चंद्र झिंजाडे, शेतकरी

'गेल्या पंधरा दिवसांपासून मी फळबागेला टँकरने पाणी घालत आहे. घरचा टँकर असूनही एका खेपाला दीड हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च न परवडणारा आहे.' 
- ईश्वर पाटील, शेतकरी पोथरे

'गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी अनेक शेतकरी नव्या व जुन्या विहीरीची खोदाई करत आहेत. सध्या किरणाला एका दिवसासाठी एक हजार रुपये रोज मिळत आहे.'
रविन्द्र झिंजाडे, क्रेन व्यावसायिक

'फळबाग जगवण्यासाठी जमिनीवर पाचटाचे आच्छादन करावे. त्यामुळे होणारे बाष्पीभवन थांबून जमिनीत ओलावा टिकून राहील शिवाय पाण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर करावा. '
सुहास पोळके, कृषी पर्यवेक्षक, करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com