सावधान! पुढे अपघातप्रवण क्षेत्र आहे; सोलापूर-हैदराबाद रस्त्याचे काम संथगतीने 

सावधान! पुढे अपघातप्रवण क्षेत्र आहे; सोलापूर-हैदराबाद रस्त्याचे काम संथगतीने 

सोलापूर : 'अंधाळ दळतंय अन्‌ कुत्र पिठ खातंय' अशी म्हण आहे. याप्रमाणेच सोलापूर-हैदराबाद महामार्गाची अवस्था झाली आहे. चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असून अनेक ठिकाणी अर्धवट रस्त्याचे कामे झाली आहेत. सोलापूरपासून 10-15 किलोमीटरपर्यंत "सकाळ'ने पाहणी केली. यात निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता असल्याचे समोर आले. रस्त्यावर खड्डे पडल्याने एखाद्या खेडेगावातील रस्ता यापेक्षा बरा असं म्हणण्याची वेळ येत आहे.

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी तरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
सोलापूर-हैदराबाद महामार्ग हा दळणवळणाच्या दृष्टीने दोन राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. मुंबई, पुणेसह, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू येथून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. याबरोबर स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने सुद्धा हा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथील वाहतूक पाहूनच केंद्र सरकारने चौपदरीकरणाला मंजुरी दिली. परंतु, हे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे सतत लहान-मोठे अपघात होतात. वेळीच लक्ष दिले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.


सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून पुढे रस्त्यावर छोटे-छोटे खड्डे पडलेले आहेत. येथे चौपदरीकरण झालेले नाही. सोलापूरकडून जाणारी आणि हैदराबादकडून येणाऱ्या वाहनांची येथे सतत कोंडी होते. रस्त्यावर दुभाजकाचे पांढरे पट्टे नाहीत. सर्व्हिस रस्ता नसून त्याचेही पांढरे पट्टे नाहीत. त्यामुळे दुचाकी आणि जड वाहने एकाच बाजूने जातात. मध्येच खड्डे असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक आहेत, तर काही ठिकाणी फलक नसल्यामुळे काम सुरू असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे चालकांना अचानक ब्रेक दाबून वेग कमी करावा लागत आहे. यातून अपघात होण्याची शक्‍यता आहे. दुचाकीस्वारांना अचानक मार्ग बदलावा लागत असल्याने काही दुचाकी घसरून पडत आहेत. रिक्षांनाही येथून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. 

सहा इंचाची पुलाला फट
सोलापूरपासून चार-पाच किलोमीटरवर मुळेगाव नाल्यावर 8.80 मीटरचे चार गाळे असलेला पूल आहे. 1985-86 मध्ये याचे राज्य सरकारने बांधकाम केले. 2010-11 मध्ये याचे नूतनीकरण झाले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा पूल मात्र दुर्लक्षित आहे. या पुलावर सहा-सात इंचाची फट फडली आहे. वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक नसला तरी येथून दुचाकी किंवा चारचाकी कारच्या दृष्टीने धोक्‍याचे आहे. ही फट लांबून दिसत नाही. रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात ही फट दिसली नाही तर त्यात गाडी जाण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मग या पुलाचे ऑडिट झाले की नाही, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

सूचना फलक नाहीत.

मुळेगाव नाल्याच्यापुढे नवीन पूल झाल्याने त्यावरून वाहतूक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी डांबरीकरण झाले असल्याने येथे वेगाने वाहने येतात. परंतु, या पुलाचे काम अर्धवट आहे. सुरक्षारक्षक कठड्याचे काम झालेले नाही. पुलाच्या बाजूने खड्डा असल्याने गाड्या आदळतात. डांबरीकरणामुळे गाड्या वेगात येतात, मात्र खड्डा अचानक दिसल्याने ब्रेक मारावा लागत आहे. येथे गाडी सावकाश चालवण्याचा किंवा काम सुरू असल्याचा फलक नाही.

दुचाकींसाठी धोक्‍याचे

अर्धवट काम आणि खड्डे यामुळे सोलापूर-हैदराबाद महामार्गावरून दुचाकीने प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. काही ठिकाणी दुचाकीस्वारांचा जीव धोक्‍यात घालून प्रवास सुरू आहे. काम सुरू असलेल्या बाजूने दुचाकी येतात आणि जिथे रस्ता कामासाठी बंद केला आहे तेथून वाहतुक सुरू असलेल्या मार्गावर येण्यासाठी खडीच्या ढिगावरून यावे किंवा जावे लागत आहे. अनेकदा पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा यामुळे अंदाज येत नाही. काही दुचाकीस्वार येथे पडतातही.

दक्षता घेण्याची सूचना; डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ 
सोलापूर-हैदराबाद महामार्गाच्या अर्धवट कामाबाबत व पुलावर पडलेल्या फटीबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर विभागाचे संजय कदम यांच्याशी मंगळवारी संपर्क साधला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, या विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या कामासाठी ठेकेदाराला डिसेंबरपर्यंत वाढीव मुदत दिली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदाराला लेखी सूचना दिल्या आहेत. यामध्ये खड्डे बुजवणे व पाणी थांबू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com