सोलापूरला लग्नकार्यासाठी शाळा न देण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या शाळा यापुढे लग्नकार्यासाठी न देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांना दिले आहेत. शाळा लग्नकार्याला दिल्यामुळे त्यांचे सौंदर्य बिघडत असल्याचे दिसून येते. शाळांचे सौंदर्य टिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक चांगले काम करत आहेत. दोन डिसेंबरला जाहीर करण्यात आलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमात जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील जवळपास 50 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. ही सगळी कामगिरी शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरुजींमुळे शक्‍य झाली आहे. जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील 356 शाळा "आयएसओ' मानांकित झाल्या आहेत. या शाळांना हे मानांकन मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी जवळपास 11 कोटी रुपयांची लोकवर्गणी गोळा केली आहे. शाळा स्वच्छ, सुंदर व्हाव्यात, यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतल्याने हे शक्‍य झाले आहे. याच शाळा लग्नकार्यासाठी दिल्यामुळे त्या विद्रूप होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळा लग्नकार्यासाठी न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवारी श्री. डोंगरे यांच्या कक्षात शिक्षण समितीचे सभापती मकरंद निंबाळकर, शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Solapur lagnakarya the decision not to school