प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रमध्ये सोलापूर अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

बृहन्मुंबईची प्रगती एक टक्‍क्‍यापेक्षा कमी; प्राथमिकच्या 20.93, तर उच्च प्राथमिकच्या 18.74 टक्के शाळा प्रगत
सोलापूर - शिक्षणाच्या संदर्भात राज्यात राबविल्या जाणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमात शैक्षणिक गुणवत्तेत सोलापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ऑक्‍टोबर 2016 पर्यंत जाहीर झालेल्या अहवालानुसार राज्यातील 20.93 टक्के प्राथमिक, तर 18.74 टक्के उच्च प्राथमिक शाळा प्रगत झाल्या आहेत. बृहन्मुंबईची प्रगती एक टक्‍क्‍यापेक्षा कमी म्हणजे 0.92 टक्के झाली आहे.

शैक्षणिक गुणवत्तेत राज्यास राष्ट्रीय स्तरावर तिसरे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाची घोषणा झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी 50 टक्के प्राथमिक, तर 25 टक्के उच्च प्राथमिक शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यात प्राथमिक शाळांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झालेल्या जिल्ह्यात सोलापूर व भंडारा जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. सोलापूर जिल्ह्यात 62.05 टक्के प्राथमिक शाळा, तर भंडारा जिल्ह्यात 61.83 टक्के प्राथमिक शाळा प्रगत झाल्या आहेत. प्रगत झालेल्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये गोंदिया, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांनी अव्वल स्थान मिळविले आहे. या तीन जिल्ह्यांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त शाळा प्रगत झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील उच्च प्राथमिकच्या 60.84 टक्के, नगर 60.49, तर सोलापूर 58.95 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत.

"केआरए'मध्ये होणार नोंद
शिक्षण विभागासाठी केलेल्या "केआरए' (की रिझल्ट एरिया-कार्याचे मूल्यमापन) मध्ये याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाशी संबंधित यंत्रणांनी 100 टक्के मुले शिकत असलेल्या प्रगत शाळांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी केले आहे. प्रगत शाळांचा मूल्यमापन अहवाल सादर करताना यापुढे प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागांचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. राज्य स्तरावरून त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून प्रगत शाळांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

प्रगत शाळांची राज्यातील स्थिती (प्राथमिक शाळा)
50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक - सोलापूर, भंडारा
40 ते 50 टक्के -
30 ते 40 टक्के - उस्मानाबाद, बुलडाणा, वर्धा, धुळे.
20 ते 30 टक्के - नगर, गोंदिया, सांगली, चंद्रपूर, पुणे, रायगड, कोल्हापूर, नागपूर, जालना, वाशीम, औरंगाबाद, रत्नागिरी, अमरावती, हिंगोली.
10 ते 20 टक्के - पालघर, बीड, यवतमाळ, अकोला, परभणी, सातारा, लातूर, जळगाव, ठाणे.
10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी - नंदूरबार, सिंधुदुर्ग, नांदेड, गडचिरोली, नाशिक, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई.

Web Title: Solapur in Maharashtra advanced academic top