पहिल्या तिन्ही बायका एकत्र आल्या अन् चौथ लग्न...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

'तीन बायका आणि फजिती ऐका' या म्हणीचा प्रत्येय येथे आला असून, लखोबा लोखंडेचे बिंग फोडले आहे.

सोलापूर : पहिल्या तिन्ही बायका त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला सोडून गेल्या होत्या. तो पुन्हा एकीचे आयुष्य उद्धस्त करायला निघाला होता. सुदैवाने पहिल्या तिन्ही बायका एकत्र आल्या अन् त्याचा चौथ्या विवाहाचा कट उधळून लावला.

'तीन बायका आणि फजिती ऐका' या म्हणीचा प्रत्येय येथे आला असून, लखोबा लोखंडेचे बिंग फोडले आहे. एखाद्या चित्रपट किंवा नाटकाच्या कथानकाला शोभेल असा प्रकार येथे घडला आहे. प्रकाश जगनगवळी याने तीन महिलांशी विवाह केला आहे. तो चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना त्याच्या तिन्ही बायकांनी एकत्र येत त्याचे बिंग फोडले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

प्रकाश जगनगवळी याने 2006 मध्ये पहिला विवाह केला. विवाहानंतर रिक्षासाठी पैसे हवेत म्हणून पत्नीशी भांडण काढू लागला शिवाय मारहाणही करायचा. प्रकाशच्या छळाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. पहिली पत्नी निघून गेल्यामुळे त्याने 2015 मध्ये एका मुलीला बीएसएनएलमध्ये क्लार्क असल्याचे सांगून दुसरा विवाह केला. तिच्याकडून हुंडा घेतला आणि पुन्हा तिलाही त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून दुसरी पत्नीही निघून गेली. दुसरी पत्नी घर सोडून गेल्यावर त्याने तिसरा विवाह केला. तिसऱ्या पत्नीलाही त्याने त्रास दिला. त्यामुळे ती पण घर सोडून निघून गेली. प्रकाशने चौथ्या विवाहाची तयारी सुरु केली होती. पण, यावेळेस मात्र त्याचे भिंग फुटले. त्याच्या पहिल्या तिन्ही बायकांना याबाबतची माहिती समजली. तिघींनी एकमेकांशी संपर्क साधला आणि थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या महिलांनी प्रकाश जगनगवळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, तीन महिलांनी प्रकाशच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने चौथ्या तरुणीचे आयुष्य वाचल आहे. मात्र, तो फरार असून, त्याच्या जाळ्यात फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur man maried 3 times women fir registered at the police station