गुन्हा दाखल असलेले भरणार सोलापूर बाजार समितीचा अर्ज 

तात्या लांडगे
मंगळवार, 29 मे 2018

बाजार समितीच्या तत्कालीन सभापती व संचालकांविरोधात दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषापोटी करण्यात आला असून बाजार समितीवर भाजपची सत्ता यावी, यासाठी ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

सोलापूर - बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराला संबंधित मतदारसंघासाठी आरक्षणनिहाय अर्ज करावे लागणार आहेत. मतदार यादीत नाव असलेल्या सूचक व अनुमोदकांद्वारे हस्ते उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करता येईल, अशी तरतूद असल्याची माहिती सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी सांगितले. त्यामुळे आता गुन्हा दाखल झालेले बहुतांशी उमेदवार बाजार समितीच्या रणांगणात उतरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
 
बाजार समितीच्या तत्कालीन सभापती व संचालकांविरोधात दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषापोटी करण्यात आला असून बाजार समितीवर भाजपची सत्ता यावी, यासाठी ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार, कोणता पक्ष कोणासमवेत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बार्शीचा कार्यक्रम आज जाहीर होणार -
जिल्ह्यातील सोलापूर व बार्शी बाजार समितीच्या निवडणूका होत असून उद्या (बुधवारी) बार्शी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. बार्शी बाजार समितीचे मतदानही चिठ्ठीद्वारेच होणार असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी शिवाजी जगताप यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

सोलापूर बाजार समितीच्या तत्कालीन सभापती व संचालकांवर बाजार समितीत अनियमितता केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. ते आता अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. परंतु, ते व्यक्‍तिश: अर्ज करू शकत नसले तरीही मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या अन्य मतदारांमार्फत (सूचक व अनुमोदक) अर्ज भरू शकतात. त्यामुळे तत्कालीन संचालकदेखील निवडणुकीसाठी अर्ज करणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Solapur Market Committee Application