सोलापूर - काँग्रेसला एकीचा फायदा तर भाजपला बेकीचा धोका 

तात्या लांडगे
रविवार, 20 मे 2018

सहकारमंत्री व पालकमंत्री यांच्यातील दोस्ताना या बाजार समितीच्या निवडणुकीत कायम राहिला तरच भाजपला फायदा होणार आहे. भाजपच्या आतापर्यंतच्या झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही बाजूचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित दिसले नाहीत. 
 

सोलापूर - सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला नेत्यांच्या एकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सहकारमंत्री व पालकमंत्री यांच्यातील दोस्ताना या बाजार समितीच्या निवडणुकीत कायम राहिला तरच भाजपला फायदा होणार आहे. भाजपच्या आतापर्यंतच्या झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही बाजूचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित दिसले नाहीत. 

सहकारमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची तर आगामी लोकसभा व विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई समजली जाणाऱ्या बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी खुद्द माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या रणांगणात उतरले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे आणि सुरेश हसापुरे यांचे माजी आमदार दिलीप माने यांच्याशी सूत जुळविण्यात शिंदे यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेसने उत्तर सोलापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी केली असून त्याला साठे यांनीही होकार दर्शविला आहे. मात्र, कार्यकर्त्यांचे काँग्रेसशी आणखी सूत जुळलेले नाही, अशी चर्चा आहे. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख हेही आपल्या कार्यकर्त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याकडे बाजार समितीच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यासाठी सहकारमंत्र्यांचे मार्गदर्शन पवार घेत आहेत. काँग्रेसकडून काँग्रेसची सत्ता बाजार समितीत यायला नको, असे नियोजन भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या नियोजनला शह देण्याकरिता काँग्रेसने आता शिवसेनाला काही जागा देण्याचे नियोजन केल्याची चर्चा आहे. 

आता बैठकांचा जोर -
बाजार समितीवर सत्ता मिळविण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांवर बैठका सुरू झाल्या आहेत. भाजप अर्थात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार राजकीय बांधणी सुरू असून शिवसेनेसह अन्य स्थानिक संघटनांना बरोबर घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीचे बळीराम साठे काँग्रेससोबत गेले तर त्यांचे कार्यकर्ते आपल्याबरोबर राहतील, असे नियोजन भाजपकडून सुरू आहे. आता सहकारमंत्री देशमुख उद्या (सोमवारी) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: solapur market committee election