सोलापूरच्या महापौर बदल चर्चेला मिळाला पूर्णविराम 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 1 जुलै 2018

सोलापूर - भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील कोणत्याही महापालिकेतील महापौर किंवा पदाधिकारी बदलण्याचा पक्षाचा अजेंडा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुण्यात स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सोलापूरच्या महापौर बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माझी नियुक्ती अडीच वर्षांचीच होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याने अधिक जोमाने काम करेन, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सोलापूर - भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील कोणत्याही महापालिकेतील महापौर किंवा पदाधिकारी बदलण्याचा पक्षाचा अजेंडा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुण्यात स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सोलापूरच्या महापौर बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माझी नियुक्ती अडीच वर्षांचीच होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याने अधिक जोमाने काम करेन, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी "सकाळ'ला सांगितले. 

महापालिकेत सत्तांतर झाल्यावर भाजपची सत्ता आली. त्या वेळी शासकीय विश्रामधाममध्ये झालेल्या बैठकीत महापौरपदासाठी सौ. बनशेट्टी व श्रीकांचना यन्नम यांच्या नावाची चर्चा होती. या बैठकीत प्रत्येकी सव्वा वर्षे या प्रमाणे सौ. बनशेट्टी व सौ. यन्नम यांना महापौरपदाची संधी मिळेल असे ठरल्याचे पालकमंत्री विजय देशमुख व खासदार ऍड. शरद बनसोडे यांचा दावा आहे. मात्र, असे काहीच ठरले नसल्याचे महापौरांचा दावा आहे. उलट, अडीच वर्षे मिळत असतील तरच महापौरपदाची संधी द्या, अन्यथा नको अशी मागणी आम्ही केली होती, त्यानंतरही  महापौरपद दिले गेले, असे सौ. बनशेट्टी यांचे म्हणणे आहे. सव्वा वर्ष होत आले तसे महापौर बदलाच्या मागणीला वेग आला. पद्मशाली समाजातील संघटनांनीही समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी सुरू केली. त्यातच बाजार समितीच्या निवडणुकीत महापौरांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला, त्यानंतर महापौर बदलाच्या मागणीला आणखी जोर चढला. पण सौ. बनशेट्टी यांनी अडीच वर्षेच महापौरपदावर राहणार असा दावा केला व त्या ठाम होत्या. 

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह राज्यातील आठ महापौर बदलण्याची चर्चा रंगली होती. त्यामध्ये सोलापूरचे नाव नव्हते, पण केव्हाही बदल होऊ शकतो, असे वातावरण होते. मात्र, श्री. दानवे यांनी पुण्यात झालेल्या आमदारांच्या बैठकीत, राज्यातील कोणत्याही महापौरांना हटविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सोलापूरच्या महापौरही बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले. पालकमंत्री सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत दंग आहेत. त्यामुळे, निवडणुकीनंतर महापौर बदलासाठी ते पुन्हा आग्रह धरणार की अडीच वर्षांचा कालावधी सौ. बनशेट्टी यांनाच पूर्ण करू देणार हे स्पष्ट होणार आहे. 

पद्मशाली समाजासाठी आग्रह धरणार - महापौर 
पद्मशाली समाजाचा पूर्ण अडीच वर्षांचा महापौर व्हावा यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहे. माझ्या जागी आता पद्मशाली समाजाच्या नगरसेवकाला संधी दिली तरी, लोकसभा आणि विधानसभेच्या आचारसंहितेतच सहा महिने जाणार आहेत. त्यांच्यावर अन्याय कशाला? पुढच्या टर्ममधील पूर्ण अडीच वर्षे पद्मशाली समाजाच्या नगरसेवकांना द्यावी अशी माझी भूमिका असणार आहे, असेही सौ. बनशेट्टी म्हणाल्या. 

प्रत्येकी सव्वा वर्षांचे महापौर करण्याचा निर्णय कधीच झाला नाही. मात्र, पालकमंत्र्यांनी स्वतःच्या प्रियजनाच्या डोक्‍यावर हात ठेवून, असा निर्णय झाल्याचे सिद्धेश्‍वर मंदिरात सांगितले तर मी त्या क्षणी महापौरपदाचा राजीनामा देईन. 
- शोभा बनशेट्टी, महापौर

Web Title: solapur mayor changes issue BJP politics