सोलापूर महापालिकेचे आर्थिक व्यवहार आता एका क्लिकवर

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 19 जुलै 2018

महापालिकेचे सर्व आर्थिक व्यवहार एका क्लिकवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष सॅाफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

सोलापूर - महापालिकेचे सर्व आर्थिक व्यवहार एका क्लिकवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष सॅाफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

यावेळी आयुक्त ढाकणे म्हणाले की, सध्या मक्तेदारांच्या देय रकमा, इतर बिले देण्यासाठी धनादेशाचा वापर केला जातो. मात्र ही यंत्रणा सुरू झाल्यावर धनादेश हा प्रकारच राहणार नाही. सर्व व्यवहार हे पेपरलेस आणि अॅानलाईन पद्धतीने केले जातील. त्यासाठी सॅाफ्टवेअर तयार करण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असून, साधारणपणे 2020 पासून सर्व व्यवहार पेपरलेस होतील असे नियोजन आहे.

सध्या विविध विकासकामांचे अभिप्राय हे लेखी देण्यात येतात. भविष्यात हे अभिप्रायही प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत अॅानलाईन देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक झोनसाठी केलेली तरतूद, प्रत्यक्षात उपलब्ध असलेली रक्कम याचा तपशील त्यात असेल. तरतूद रकमेपेक्षा जास्तीचे प्रस्ताव आले तर ते आपोआप नाकारले जातील. अशी व्यवस्था त्यामध्ये असणार आहे. कर्मचार्यांचे वेतन आणि
आयकर कपातीची सोयही या माध्यमातून केली जाणार आहे. वेतनाची बिले वेळेवर आली तर, पगारही वेळेत करण्याचे नियोजन आहे, असेही ढाकणे यावेळी म्हणाले.

सर्व बँकांमध्ये होणार कर भरण्याची सोय
सध्या एचडीएफसी आणि आयसीआयसीआयच्या सहकार्याने महापालिकेचा कर भरण्याची सुविधा केली जाणार आहे. भविष्यात कोअर बँकींग क्षेत्रातील सर्व
बँकामध्ये ही सुविधा केली जाणार आहे. सध्या निश्चित करण्यात आलेल्या 9 केंद्रांवर 24 किंवा 25 जुलैपासून कर भरण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे अशी माहितीही आयुक्त ढाकणे यांनी दिली आहे

Web Title: solapur MNP financial transaction is now on one click